गुजरातने सौराष्ट्रावर सहा विकेट राखून मात करीत विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील पश्चिम विभागात प्रथमच विजेता होण्याचा मान मिळविला. या विजयासह गुजरातने १३ गुणांसह पश्चिम विभागात अव्वल स्थान घेतले आणि रमाकांत देसाई चषक जिंकला. मुंबईला १२ गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
गहुंजे येथील स्टेडियमवर झालेल्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना सौराष्ट्राने ५० षटकांत ६ बाद २६९ धावा केल्या. त्यामध्ये शेल्डॉन जॅक्सन या सलामीवीराने शैलीदार शतक झळकाविले. त्याने नऊ चौकार व चार षटकारांसह १०९ धावा केल्या. तसेच त्याने राहुल दवे याच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारीही केली. दवे याने दमदार ३६ धावा केल्या. त्यानंतर प्रतीक मेहता (२४), चिराग जानी (३१) व कुलदीप रावळ (नाबाद ३०) यांनीही संघास आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात मदत केली.
कर्णधार पार्थिव पटेल व प्रियांक पांचाळ या गुजरातच्या सलामीवीरांनी आत्मविश्वासाने खेळ करीत १३६ धावांचा पाया रचला. पांचाळने चार चौकार व एका षटकारासह ७० धावा केल्या. पटेल याने तीन चौकार व तीन षटकारांसह ७८ धावा टोलविल्या. ही जोडी परतल्यानंतर मनप्रित जडेजा व अब्दुल्लाह मलिक यांनीही दमदार खेळ करीत संघास विजय मिळवून दिला. मनप्रितने सात चौकार व दोन षटकारांसह ६६ धावा केल्या. मलिकने नाबाद २६ धावा केल्या.
संक्षिप्त निकाल
सौराष्ट्र : ५० षटकांत ६ बाद २६९ (शेल्डॉन जॅक्सन १०९, राहुल दवे ३६, प्रतिक मेहता २४, चिराग जानी ३१, कुलदीप रावळ नाबाद ३०; मेहुल पटेल ३/५२, राकेश ध्रुव २/४६) पराभूूत वि. गुजरात ४७ षटकांत ४ बाद २७० (प्रियांक पांचाळ ७०, पार्थिव पटेल ७८, मनप्रित जुनेजा ६६, अब्दुल्लाह मलिक नाबाद २६)