Gus Atkinson Creates History with Fifer IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल कसोटी सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ओव्हल कसोटीत गस एटकिन्सनने दुखापतीनंतर पुनरागमन केलं. पुनरागमनाच्या कसोटी सामन्यातच एटकिन्सनने भारताविरूद्ध पहिल्याच डावात ५ विकेट्स घेतले. यासह त्याने एक दुर्मिळ विक्रम आपल्या नावे केला आहे. गेल्या १२९ वर्षांमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.
ऑली पोपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यजमान संघाने भारताला २२४ धावांत सर्वबाद केलं. यामध्ये एटकिन्सनने महत्त्वाची भूमिका बजावली. एटकिन्सनने फक्त ३३ धावा देत पाच बळी घेतले. त्याने यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांना बाद केले.
दुखापतीमुळे पहिल्या चार कसोटी सामन्यांना मुकल्यानंतर ओव्हलमध्ये केलेल्या अविश्वसनीय कामगिरीसह, एटकिन्सनने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील स्वप्नवत कामगिरी सुरू ठेवली आहे. उजव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजाने आता फक्त १३ सामन्यांमध्ये (२४ डावांमध्ये) ६० बळी घेतले आहेत, ज्यामध्ये २१ च्या सरासरीने आणि ३४.९ च्या स्ट्राईक-रेटने चार वेळा पाच बळी घेतले आहेत.
गस एटकिन्सनने घडवला इतिहास
इंग्लंडच्या जॉर्ज लोहमन यांच्यानंतर एटकिन्सन हा क्रिकेट इतिहासातील दुसरा गोलंदाज आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये ३५ पेक्षा कमी स्ट्राईक रेटने ६० पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. लोहमन यांनी १२९ वर्षांपूर्वी १८९६ मध्ये झालेल्या त्यांच्या कसोटी कारकिर्दीत ११२ विकेट्स घेतल्या होत्या. आता १२९ वर्षांनंतर अशी कामगिरी करणारा एटकिन्सन पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
कमीत कमी ५० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये, फक्त शमार जोसेफचा स्ट्राईक रेट चांगला आहे, ज्याने लोहमन यांच्या ३४.१ स्ट्राईक रेटची बरोबरी साधली आहे आणि एटकिन्सनपेक्षाही चांगला आहे. गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर जोसेफने गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा टप्पा गाठला. वेस्ट इंडिजच्या या स्टार गोलंदाजाने ११ सामन्यांमध्ये ५० विकेट्स घेतले आहेत आणि चार वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
उत्कृष्ट स्ट्राईक रेट असणारे गोलंदाज
जॉर्ज लोहमन -(इंग्लंड) – ३४.१ – ११२ विकेट्स – १८८६ – १८९६
गस एटकिन्सन (इंग्लंड) – ३४.९ – ६० विकेट्स – २०२४ ते आतापर्यंत
स्कॉट बोलँड (ऑस्ट्रेलिया) – ३६.० – ६२ विकेट्स – २०२१ ते आतापर्यंत