रिओ ऑलिम्पिकमध्ये फार कमी फरकाने भारताची जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकरचे पदक हुकले. पण जिच्यामुळे तिचे पदक हुकले त्या अमेरिकेच्या सिमोन बिल्सला पराभूत करण्याचे ध्येय दीपाने टोकिओ ऑलिम्पिकमध्ये डोळ्यापुढे ठेवले आहे.
‘टोकिओमधील २०२० ऑलिम्पिकमध्ये सिमोन बिल्सला पराभूत करणे हे माझे पहिले ध्येय असेल. मला नक्कीच माहिती आहे की, ही गोष्ट सोपी नाही. पण तिला पराभूत करायचे म्हणजे मला सुवर्ण किंवा रौप्यपदक पटकावणे गरजेचे असेल. त्यामुळे काही दिवसांमध्येच मी सरावाला लागणार आहे,’ असे दीपाने सांगितले.
ती पुढे म्हणाली की, ‘सध्या काही दिवस मी विश्रांती घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर दुर्गापूजेच्या उत्सवाचा मला आनंद घ्यायचा आहे. त्यामुळे आता दसऱ्यानंतरच मी सरावाला सुरुवात करेन, पण तंदुरुस्ती कायम राखण्याचे व्यायाम मात्र सुरूच आहेत. त्यामध्ये मी कधीही खंड पडू देणार नाही.’