जिम्नॅस्टिक्समध्ये ऑलिम्पिक प्रवाहापासून भारत खूपच दूर राहिला आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे तिकीट निश्चित केलेली दीपा कर्माकरकडे भारतास या खेळात पहिले ऑलिम्पिक पदक मिळविण्याची क्षमता आहे, असे आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स पंच व प्रशिक्षक सविता जोशी-मराठे यांनी सांगितले. २०१०च्या आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी झालेल्या राष्ट्रीय शिबिरात मराठे यांनी दीपाला मार्गदर्शन केले होते. फ्लोअर एक्झरसाइज, व्हॉल्ट आदी प्रकारांबाबत मराठे यांनी दीपाला मौलिक सूचना दिल्या होत्या.
त्रिपुराच्या दीपाने नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेद्वारे ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला आहे. रिओ येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमधील व्हॉल्ट या क्रीडाप्रकारात पदक मिळविण्याची तिला संधी आहे. ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळवीत कौतुकास्पद कामगिरी केली होती. आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने चीनच्या स्पर्धकांना झुंज देत चौथे स्थान मिळविले होते.
महाराष्ट्रीय मंडळात प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या मराठे यांनी १९८२ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्या वेळी त्यांच्यासमवेत असलेला भारताचाच खेळाडू बिश्वेश्वर नंदी हे दीपाचे प्रशिक्षक आहेत.
दीपाकडे असलेल्या क्षमतेविषयी मराठे म्हणाल्या, ‘ती जिम्नॅस्टिक्सकरिता झपाटलेली व जिद्दी खेळाडू आहे. बावीस वर्षीय दीपाने गेल्या चारपाच वर्षांमध्ये आपल्या कामगिरीत खूप सुधारणा केल्या आहेत. नंदी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने अवघड कौशल्ये आत्मसात केली आहेत. व्हॉल्टमध्ये दीपाची सध्याची कामगिरी ऑलिम्पिकमध्ये पदकाइतकी कामगिरी आहे. दीपाला भारतीय क्रीडा प्राधिकरण व लक्ष्य फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले आहे. ऑलिम्पिकसाठी अजून बराच कालावधी आहे. या कालावधीत तिला परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन किंवा परदेशातील स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली, तर ती ऑलिम्पिक पदक खेचून आणू शकेल.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संघटनांतील मतभेदामुळे दीपा आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकांपासून दूर
आपल्या देशात सध्या राष्ट्रीय स्तरावर दोन संघटना कार्यरत आहेत. त्यांच्यामधील मतभेदांमुळे दीपासह भारतीय खेळाडूंना जागतिक स्तरावरील स्पर्धेत भाग घेता आला नाही. अन्यथा दीपाच्या नावावर जागतिक स्तरावरील दोन सुवर्णपदकांची भर झाली असती. गेली दोन वर्षे राष्ट्रीय स्पर्धाच झालेली नाही. जागतिक दर्जाच्या अद्ययावत सुविधांचा आपल्याकडे अभाव आहे, असे असतानाही दीपा हिने ऑलिम्पिक प्रवेश करीत या खेळास सन्मानाचे स्थान मिळवून दिले आहे, असेही मराठे यांनी सांगितले.

स्वतंत्र प्रशिक्षकांची गरज; पायाभूत सुविधा नाहीत
परदेशांच्या तुलनेत आपल्या देशात जिम्नॅस्टिक्सच्या विकासाकरिता योग्य नियोजन नाही. पायाभूत सुविधा नाहीत. मुलींना कधीही परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळालेले नाही. परदेशी खेळाडूंना अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी मिळते. आपल्या खेळाडूंना अशा संधी क्वचितच मिळतात. फ्लोअर एक्झरसाइजकरिता स्वतंत्र प्रशिक्षकांची आवश्यकता असते. दुर्दैवाने आपल्या खेळाडूंकरिता असे प्रशिक्षक नाहीत. तरीही दीपा कर्माकर, आशिषकुमार यांच्यासारख्या नैपुण्यवान खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतास नावलौकिक मिळवून दिला आहे, असे मराठे म्हणाल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gymnastics coach and referee savita joshi marathe praise dipa karmakar
First published on: 19-04-2016 at 06:07 IST