भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. वन-डे क्रिकेटमध्ये ३ द्विशतकं झळकावण्याचा अनोखा विक्रम रोहित शर्माच्या नावावर जमा आहे. पहिली ५-१० षटकं मैदानात रोहित शर्मा टिकला तर त्यानंतर त्याला बाद करणं हे कठीण असतं असं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे. याच रोहित शर्माकडे टी-२० क्रिकेटमध्येही द्विशतक झळकावण्याची संधी होती. खुद्द रोहित शर्मानेच सोशल मीडियावर एका लाईव्ह चॅटमध्ये याबद्दल खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात २०१७ साली इंदूरच्या मैदानावर टी-२० सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम केला होता. ( ३५ चेंडूत १०० धावा ) या सामन्यात रोहित ४३ चेंडू खेळून ११८ धावांवर बाद झाला. ज्यावेळी रोहित शर्मा बाद झाला त्यावेळी सामन्यात ७ षटकं टाकणं बाकी होतं. “त्या सामन्यात माझ्याकडे द्विशतक झळकवायची चांगली संधी होती. मी बाद झालो त्यावेळी खूप षटकं बाकी होती, त्यामुळे मी खूप चांगली संधी वाया घालवली. पण ३५ चेंडूत १०० धावा ही देखील काही वाईट कामगिरी नव्हती त्यामुळे मी समाधानी आहे.”

सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. बीसीसीआयनेही आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. २०२० वर्षात भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात रोहित शर्मा सहभागी झाला होता, मात्र अखेरच्या टी-२० सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे त्याला आपलं संघातलं स्थान गमवावं लागलं होतं. आयपीएलमध्ये रोहित मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करतो. मात्र करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे यंदाच्या हंगामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. यातून परिस्थिती सावरल्यास भारतीय क्रिकेटपटू मैदानात कधी उतरतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Had a chance to score t20i double century against sri lanka says rohit sharma psd
First published on: 03-05-2020 at 09:29 IST