गुरप्रितचे पदक हुकले
भारताच्या हरप्रीत सिंगने ग्रीको-रोमन विभागातील ८० किलो गटात कांस्यपदक पटकावले आणि आशियाई कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत त्याचे हे लागोपाठ दुसरे कांस्यपदक आहे. त्याचा सहकारी गुरप्रित सिंगला मात्र पदक मिळवण्यात अपयश आले.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी हरप्रीतने चीनच्या जुनजेई ना याच्यावर ३-२ अशी मात केली. या लढतीमधील पहिल्या फेरीत १-१ अशी बरोबरी होती. मात्र नंतरच्या फेरीत हरप्रीतने चांगले डावपेच करीत आघाडी घेतली व ती शेवटपर्यंत टिकवली. शेवटच्या ३० सेकंदांत चीनच्या मल्लाने एक गुण मिळवत रंगत निर्माण केली होती. परंतु हरप्रीतने नंतर उत्कृष्ट डावपेच करीत विजयश्री मिळवली. त्याने गतवर्षी बँकॉक येथे झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते.
हरप्रीतचे येथील पदक भारतासाठी एकमेव यश ठरले. भारताच्या अन्य खेळाडूंना अपयशास सामोरे जावे लागले. गुरप्रीतने रेपीएज फेरीद्वारे कांस्यपदकाच्या आशा निर्माण केल्या होत्या, मात्र चीनच्या बिन यांगने त्याला केवळ ३८ सेकंदांमध्ये चीत केले व निर्णायक विजयासह ८-० अशी लढत जिंकली.
ग्रीको-रोमन विभागातील ८० किलो गटात हरप्रीतने जपानच्या युया माईतावर २-१ अशी मात करीत शानदार सुरुवात केली होती, मात्र नंतरच्या फेरीत त्याला दक्षिण कोरियाच्या जुआन हुयांग किमने ८-० असे लीलया पराभूत केले. किमने या गटात अंतिम फेरी गाठल्यामुळे हरप्रीत याला कांस्यपदकाच्या रीपीचेज फेरीत स्थान मिळाले.
गुरप्रीतने रीपीचेज फेरीत किर्गिझस्तानच्या बुगरे बेशिलिव याचा पराभव करीत आव्हान राखले. त्याने या गटातील पात्रता फेरीत उझबेकिस्तानच्या दिल्शोजॉन तुर्दियेववर ६-४ असा विजय मिळवला होता. त्यानंतर त्याला उपांत्यपूर्व फेरीत कझाकिस्तानच्या मक्झात येरेझेपोव्हकडून ६-८ असा पराभव स्वीकारावा लागला होता. मक्झातने अंतिम फेरीत स्थान मिळवल्यामुळे गुरप्रीत हा कांस्यपदकाच्या फेरीसाठी पात्र ठरला. कांस्यपदकासाठी त्याला चीनच्या बिन यांगशी खेळावे लागणार आहे.
भारताच्या रवींदर (६६ किलो), हरदीप (९८ किलो) व नवीनकुमार (१३० किलो) यांचे आव्हान संपुष्टात आले. हरदीपला रीपीचेज फेरीत
स्थान मिळाले होते, मात्र कझाकिस्तानच्या येरुलान इस्काकोवने त्याचा ९-० असा दणदणीत पराभव केला. मुख्य विभागातील उपांत्यपूर्व फेरीत हरदीपला इराणच्या सय्यद मुस्तफाकडून ०-५ अशी हार मानावी लागली.
सय्यदने अंतिम फेरीत स्थान मिळवल्यानंतर त्याचा रीपीचेज फेरीतील प्रवेश निश्चित झाला होता. रवींदरला उपांत्यपूर्व फेरीत इराणच्या अली रेझोलाह अर्सालनने ५-३ असे हरवले. उझबेकिस्तानच्या मुमिनिजान अब्दुल्लायेवने नवीनवर २-१ अशी मात केली.
आशियाई स्पर्धेत पदक मिळवण्याचा मला आत्मविश्वास होता. मी या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली होती. अन्य सहकारी पराभूत झाल्यामुळे माझ्यावरच देशाच्या पदकाचे भवितव्य अवलंबून होते. साहजिकच माझ्यावर ते दडपण आले होते. तथापि मी जिद्दीने लढलो. त्यामुळेच मला पदक मिळविता आले. – हरप्रीत सिंग