Harry Brook Wicket: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत जो रूट आणि हॅरी ब्रूकने मिळून भारताविरूद्ध वादळी फटकेबाजी केली. ब्रूक आणि रूटने मिळून १९५ धावांची भागीदारी रचत इंग्लंडचा डाव सावरला. ब्रूकने या सामन्यात शतक झळकावत वादळी खेळी केली. पण आकाशदीपने पुन्हा एकदा ब्रूकला बाद करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. ब्रूक स्वत:च्या चुकीमुळे शतकी खेळीनंतर झेलबाद झाला.

इंग्लंडचा संघ ३ बाद १०६ धावांवर असताना हॅरी ब्रूक फलंदाजीला आला आणि त्याने वनडे क्रिकेटच्या शैलीत आक्रमक फटकेबाजीला सुरूवात केली. एका षटकात १६,१२ धावा कुटत त्याने भारताच्या गोलंदाजांची शाळा घेतली. यासह ब्रूकने ३९ चेंडूत त्याचं अर्धशतक केलं. तर नंतर ९१ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांसह शतक केलं.

हॅरी ब्रूकचं वनडे शैलीत फटकेबाजी करत शतक

ब्रूक शतकी खेळीनंतरही वेगाने धावा करत होता. भारतीय गोलंदाजांच्या गोलंदाजीवर तो सहज धावा करत होता आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. आकाशदीपच्या ६३व्या षटकातील चौथ्या चेंडूवर जोरात मोठा फटका खेळायला गेला आणि त्याची बॅट हवेत उडाली. चेंडू आणि बॅटचा नीट संपर्क न झाल्याने चेंडू हवेत उंच उडाला आणि सिराजने यावेळेस कोणतीही चूक न करता झेल टिपला.

ब्रूकची ही विकेट पाहून ऋषभ पंतची आठवण झाली. इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतदेखील असाच बाद झाला होता. ऋषभ पंत शोएब बशीरच्या षटकात मोठा फटका खेळायला गेला होता, पण त्याची बॅट हवेत उंच उडाली आणि तो झेलबाद झाला होता. ब्रूकने पहिल्या डावात ऋषभ पंतसारखा खाली पडून फटका खेळला होता, त्यानेही लक्ष वेधलं होतं. आता तो पंतसारखा फटका खेळत बाद झाला.

आकाशदीपने हॅरी ब्रूकची विकेट घेतली असली तरी भारताला विकेट मिळवण्यात उशीर झाला आहे. कारण ब्रूकसह रूटने भारताला विजयापासून दूर नेलं. टीब्रेकपर्यंत इंग्लंडने ४ बाद ३१७ धावा केल्या आहेत. यासह इंग्लंडला विजयासाठी ५७ धावांची गरज आहे.