जगभरासह भारतालाही करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा चांगलाच फटका बसलेला आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या लॉकडाउनचा सामना क्रीडा विश्वालाही करावा लागला आहे. या काळात काही खेळाडूंवर करोनाने चांगलंच मोठं संकट आणलं आहे. नागपूरची उदयोनमुख धावपटू प्राजक्ता गोडबोले लॉकडाउन काळात करोना आणि भूक अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत होता. नागपूरच्या सिरसापेठ भागात राहणाऱ्या प्राजक्ताची आई लग्नाचं कंत्राट घेणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडे जेवणं करायचं काम करते, मात्र सध्याच्या काळात रोजगार तुटल्यामुळे गोडबोले परिवाराकडे दोन वेळच्या जेवणासाठीचेही पैसे नव्हते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राजक्तच्या परिवारावर ओढवलेल्या परिस्थितीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समजली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी नागपूरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांना संपर्क साधत प्राजक्ताच्या परिवाराला मदत करण्याचे आदेश दिले आहेत. “काही दिवसांपूर्वीच आम्ही गोडबोले परिवाराशी संपर्क साधला…त्यांना काही दिवस पुरेल असं अन्नधान्य आणि १६ हजार रुपयांची मदत आम्ही केली आहे. यापुढेही मदत लागल्यास आम्ही त्यांच्या संपर्कात राहणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्राजक्ताच्या परिवाराबद्दल माहिती कळल्यानंतर त्यांनी आम्हाला मदत करण्याचे आदेश दिले.” शिवसेनेचे नागपूर शहर प्रमुख प्रकाश जाधव यांनी पीटीआयशी बोलताना माहिती दिली.

प्राजक्ताने आतापर्यंत २०१९ साली इटलीत झालेल्या World University Games मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. ५ हजार मी. धावण्याच्या शर्यतीत या स्पर्धेत प्राजक्ताने १८:२३:९२ अशी वेळ नोंदवली. मात्र अंतिम फेरीत दाखल होण्यात तिला अपयश आलं. काही दिवसांपूर्वी झालेल्या भुवनेश्वर हाफ मॅरेथॉनमध्येही प्राजक्ताने दुसरा क्रमांक पटकावला होता. प्राजक्ताचे वडील विलास गोडबोले हे सिक्युरिटी गार्डचं काम करत होते, मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे ते सध्या घरीच असतात. प्राजक्ताची आई स्थानिक केटरिंग व्यवसायात स्वयंपाक करण्याचं काम करते, ज्यातून तिला महिन्याकाठी ५ ते ६ हजाराचं उत्पन्न मिळतं. मात्र लॉकडाउ काळात सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे गोडबोले कुटुंबासमोर मोठं संकट निर्माण झालं होतं. मात्र शिवसेनेच्या मदतीनंतर गोडबोले परिवारावरच संकट दूर झालेलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Help pours in for distance runner prajakta godbole psd
First published on: 19-05-2020 at 20:37 IST