Highest Score In The Hundred: सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड क्रिकेट लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक थरारक सामने पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेतील १६ वा सामना ओव्हल इनविंसिबल्स आणि वेल्श फायर या दोन्ही संघांमध्ये पार पडला. ओव्हल इनविंसिबल्स हा मुंबई इंडियन्स संघाची मालकीण नीता अंबानी यांच्या मालकीचा संघ आहे. या संघाने द हंड्रेड लीग स्पर्धेत इतिहासाला गवसणी घातली आहे. हा सामना ओव्हल इनविंसिबल्स संघाने ८३ धावांनी आपल्या नावावर केला. ओव्हल इनविंसिबल्स संघातील फलंदाजांनी या सामन्यात तुफान फटकेबाजी केली. यासह द हंड्रेड लीग स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे.

या सामन्यात ओव्हल इनविंसिबल्स हा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना या संघाने १०० चेंडूत ४ गडी बाद विक्रमी २२६ धावा नोंदवल्या. या संघाकडून फलंदाजी करताना जॉर्डन कॉक्सने २९ चेंडूत ८९ धावांची दमदार खेळी केली. या दमदार खेळीदरम्यान त्याने १० षटकार आणि ३ चौकार लगावले. हा सामना ऐतिहासिक ठरला आहे. कारण द हंड्रेड लीग स्पर्धेच्या इतिहासात कुठल्याही संघाला २२५ धावांचा पल्ला गाठता आला नव्हता. त्यामुळे ओव्हल इनविंसिबल्स संघाने या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवण्याचा मान पटकावला आहे.

या सामन्यात ओव्हल इनविंसिबल्स संघातील फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. जॉर्डनसह विल जॅक्सने देखील २८ चेंडूंचा सामना करत ६ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ३८ धावा केल्या. यासह सॅम करनने १९ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ३४ धावांची खेळी केली.

ओव्हल इनविंसिबल्स संघाने वेल्श फायर संघासमोर विजयासाठी २२७ धावांचं भलंमोठं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना वेल्श फायर संघाचा डाव अवघ्या १४३ धावांवर आटोपला. या संघाकडून फलंदाजी करताना जॉनी बेअरस्टोने २८ चेंडूंचा सामना करत ५० धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार लगावले. यासह ल्यूक वेल्सने १८ चेंडूंचा सामना करत २ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने २९ धावांची खेळी केली. ओव्हल इनविंसिबल्स संघाकडून गोलंदाजी करताना टॉम करनने १८ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर जेसन बेहरनडॉर्फने ३ गडी बाद केले.