All 10 Batsmans Retired Out In Cricket: सध्या महिला टी-२० विश्वचषक आशियाई पात्रता फेरीतील सामने सुरू आहे. या स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात यूएई आणि कतार हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात असं काही घडलं, जे यापूर्वी क्रिकेट इतिहासात कधीच घडलं नव्हतं आणि घडण्याची शक्यताही खूप कमी आहे. मात्र, हा खेळ असा आहे जिथे रेकॉर्ड बनवले जातात आणि ते मोडलेही जातात. यावेळी रेकॉर्ड एका खेळाडूने नव्हे, तर संपूर्ण संघाने मिळून केला आहे.
बँकॉकच्या टेर्डथाई क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात यूएई संघाने एक-दोन नव्हे, तर संघातील सर्व फलंदाजांना रिटायर्ड आऊट केलं. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? पण हे खरंच घडलं आहे. यूएईने हवामानाचं कारण सांगत हा निर्णय घेतला. यूएईने या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना दमदार सुरूवात केली. यूएईकडून ईशान रोहित ओजा आणि तिर्था सतिशने मिळून पहिल्या विकेटसाठी १६ षटकांत १९२ धावा जोडल्या. त्यानंतर वातावरण खेळण्यासाठी अनुकूल नसल्याचं सांगून यूएई संघाने सर्व १० फलंदाज रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय घेतला.
कसोटी क्रिकेटमध्ये संघ डाव घोषित करू शकतो. मात्र, टी-२० आणि वनडे क्रिकेटमध्ये तसं शक्य नाही. त्यामुळे यूएईचे फलंदाज पॅड घालून मैदानात येत होते आणि रिटायर्ड आऊट होऊन मैदानाबाहेर जात होते. यूएईने कतार संघाला जिंकण्याची संधी दिली. पण, कतार संघाला याचा फायदा घेता आला नाही. या संघाला ११.१ षटकात अवघ्या २९ धावा करता आल्या. हा सामना यूएईने १६३ धावांनी आपल्या.
यूएईकडून फलंदाजी करताना सलामी जोडीने दमदार सुरूवात करून दिली. कर्णधार ईशाने ५५ चेंडूंचा सामना करत १४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ११३ धावांची खेळी केली. तर सतीशने ४२ चेंडूंचा सामना करत ७४ धावांची खेळी केली.
या खेळीदरम्यान तिने ११ चौकार मारले. फलंदाजीत धावांचा पाऊस पाडल्यानंतर, गोलंदाजीतही ईशानची जादू पाहायला मिळाली. तिने १ धाव खर्च करून १ गडी बाद केला. या कामगिरीची दखल घेत तिची प्लेअर ऑफ द मॅच म्हणून निवड करण्यात आली. या विजयासह यूएईने गुणतालिकेत अव्वल स्थानी कब्जा केला आहे.