हॉकी इंडिया लीग स्पर्धेस आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या वार्षिक कार्यक्रमपत्रिकेत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅली फेअरवीदर यांनी ही माहिती दिली.
कॅली यांनी सांगितले, वर्षभर आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉकीचे सामने सुरू रहावेत अशी आमची इच्छा आहे. त्यामुळेच हॉकी इंडिया लीगला आम्ही महत्त्वाचे स्थान दिले आहे. या स्पर्धेत अन्य देशांच्या खेळाडूंनी खेळण्यास प्राधान्य दिले आहे तसेच त्यांनी अशी स्पर्धा अनेक वेळा घेतली जावी अशीही सूचना केली आहे. युरोपियन लीग स्पर्धा गेली पाच वर्षे आयोजित केली जात आहे. महिलांसाठीही हॉकी इंडिया लीगसारखी स्पर्धा आयोजित केली जावी. ही स्पर्धा २०१५-१६ मध्ये घ्यावी अशी सूचनाही आम्ही हॉकी इंडियास दिली आहे.
हॉकी इंडियास प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. ८३ देशांमधील ५० दशलक्ष प्रेक्षकांनी या सामन्यांचा विविध चॅनेल्सद्वारे आनंद घेतला. उपांत्य व अंतिम सामन्याच्या प्रक्षेपणास त्यापेक्षा दुपटीने प्रतिसाद लाभला. ही हॉकीसाठी प्रोत्साहन देणारीच गोष्ट आहे असेही कॅली यांनी सांगितले.
सबज्युनियर राष्ट्रीय हॉकी स्पर्धा मुंबईत रंगणार
मुंबई : मुंबई हॉकी असोसिएशन लिमिटेडने हॉकी इंडियाचे सहसदस्यत्व पत्करल्यानंतर तिसरी पश्चिम विभागीय सबज्युनियर राष्ट्रीय हॉकी स्पर्धा (१७ वर्षांखालील मुला-मुलींसाठी) मुंबईत ११ ते १६ एप्रिलदरम्यान महिंद्रा स्टेडियमवर रंगणार आहे. मुलां-मुलींमध्ये मुंबई, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, भोपाळ, गोवा तसेच गुजरात हे आठ संघ सहभागी होणार आहेत. ‘‘मुंबईच्या खेळाडूंना भारतीय संघातर्फे खेळता यावे तसेच पंच आणि अधिकाऱ्यांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी, याच उद्देशाने आम्ही हॉकी इंडियात दाखल झालो. ’’