सलग सात सामन्यांमध्ये पराभवाची नामुष्की पत्करणाऱ्या मुंबई मॅजिशियन्स संघाने अखेर घरच्या मैदानावर हॉकी इंडिया लीगमधील विजयाचा श्रीगणेशा केला. महिंद्रा स्टेडियमवर झालेल्या एकतर्फी लढतीत मुंबई मॅजिशियन्स संघाने उत्तर प्रदेश विझार्ड्सवर ४-० असा दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीच्या आशा पल्लवित केल्या आहेत. आतापर्यंत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या मुंबईने एकापाठोपाठ गोलांची मेजवानी दिली, त्याचप्रमाणे स्टेडियमवर उपस्थित चाहत्यांनीही खेळाडूंना उत्स्फूर्त दाद दिली. पेनल्टीकॉर्नरवर दोन गोल झळकावणारा कर्णधार संदीप सिंग मुंबई मॅजिशियन्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला. जेसन विल्सन आणि जॉनी जसरोटिया यांनी प्रत्येकी एक गोल करत मुंबईच्या विजयात हातभार लावला. अखेरची सात मिनिटे असताना गोलरक्षकासह खेळताना उत्तर प्रदेशने गोल करण्याचे भरपूर प्रयत्न केले, पण त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले.