सलामीच्या लढतीत बलाढय़ नेदरलँड्सवर मात करणाऱ्या अर्जेन्टिनाने बेल्जियमला ३-२ असे पराभूत करत जागतिक   लीग फायनल्सा हॉकीमध्ये लागोपाठ दुसरा विजय नोंदविला. नेदरलँड्सने शनिवारी ऑस्ट्रेलियावर १-० मात करीत आपला पहिला विजय मिळविला. मेजर ध्यानचंद स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत दोन्ही सामने रंगतदार झाले. अर्जेन्टिनाविरुद्ध बेल्जियमने सहाव्या मिनिटाला गोल करीत खाते उघडले. त्यांचा हा गोल टॉम बून याने नोंदविला. तथापि, ११ व्या मिनिटाला अर्जेन्टिनाच्या पेद्रो इबारा याने पाच बचावरक्षकांना चकवित गोल केला आणि १-१ अशी बरोबरी साधली. पूर्वार्ध संपण्यास एक मिनिट बाकी असताना बून याने बेल्जियमला पुन्हा आघाडीवर नेले. मात्र त्यांचा हा आनंद फार वेळ टिकला नाही. उत्तरार्धात अर्जेन्टिनाच्या मतियास पेरेडेझ याने जुआन लोपेझच्या पासवर गोल केला आणि २-२ अशी बरोबरी साधली. ६१ व्या मिनिटाला त्याचा सहकारी फाकुडोपो याने संघाचा विजयी गोल केला. पहिल्या सामन्यात अर्जेन्टिनाकडून २-५ असा पराभव स्वीकारणाऱ्या डच खेळाडूंनी सुधारणा दाखवित ऑस्ट्रेलियावर १-० असा सनसनाटी विजय नोंदविला.