जागतिक हॉकी लीग स्पर्धेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सत्रात आज (शुक्रवारी) भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. स्पर्धेतील ‘ब’ गटात भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना सायंकाळी ७. ३० वाजता भुवनेश्वरच्या मैदानात रंगणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकावर नाव कोरुन भारताने आशियातील सर्वोत्कृष्ट संघ असल्याचे सिद्ध केलय. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाला नमवून जागतिक पातळीवर दबदबा निर्माण करण्याची नामी संधी भारतासमोर आहे. जागतिक क्रमवारीत ऑस्ट्रेलियन हॉकी संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मागील काही स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी, अझलनशहा आणि राष्ट्रकूल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताला पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे या पराभवाची परतफेड करत या स्पर्धेत विजयी सलामी देण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. जागतिक हॉकी लीग स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी असून, भारताला सलामीच्या सामन्यातच ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. भारतीय संघाचे नवनियुक्त प्रशिक्षक शोर्ड मारिन यांची देखील कसोटी असणार आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने आशिया चषकात चांगली कामगिरी केली. आता जागतिक स्तरावर संघाचा आलेख उंचावण्यासाठी ते प्रयत्नशील असतील.
भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर खेळाची शैली आणि रणनिती यामध्ये त्यांनी फारसा बदल केलेला नाही. खेळाडूंना त्यांची शैली ठरवण्याचे स्वातंत्र्य त्यांनी दिले आहे. याचा आशिया चषकात फायदा झाला. आगामी काळात भारतीय संघ आशियाई , राष्ट्रकुल आणि विश्वचषक अशा मोठ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. यापार्श्वभूमीवर संघाची ताकद आणि उणिवा यासाठी मारिन यांच्यासाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण आहे. रुपिंदर पाल आणि लाकडा यांच्या पुनरागमामुळे भारतीय संघाची ताकद वाढली आहे. त्यासोबत अमित रोहिदासने देखील संघात स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणाला थोपवण्यासाठी या खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल. या स्पर्धेतील ‘ब’ गटात ऑस्ट्रेलियाशिवाय भारतीय संघ इंग्लंड आणि जर्मनी यांच्याशीही चारहात करताना दिसेल.