ऑलिम्पिक विजेत्या जर्मनीविरुद्ध बरोबरी स्वीकारल्यानंतर भारताला जागतिक हॉकी लीगमधील उपांत्यपूर्व लढतीत बलाढय़ ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला बुधवारी सामोरे जावे लागणार आहे.
साखळी गटात इंग्लंड व न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताने जर्मनीविरुद्ध जिद्दीने खेळ केला. त्यांनी या लढतीत तीन वेळा आघाडी घेतल्यानंतर बरोबरी स्वीकारली. मात्र पहिल्या दोन सामन्यांच्या तुलनेत या सामन्यात भारतीय खेळाडूंनी चांगल्या चाली केल्या होत्या व बचावात्मक खेळातही कौतुकास्पद कामगिरी केली होती. जर्मनीला बरोबरीत रोखल्यामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे.
ऑस्ट्रेलियाला विजेतेपदाचे दावेदार समजले जात असले तरी त्यांना साखळी लढतीत नेदरलँड्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळेच भारतीय संघाला त्यांच्याविरुद्ध विजयाच्या आशा आहेत. जर्मनीविरुद्ध भारतीय खेळाडूंनी चांगला समन्वय दाखविला होता तसेच त्यांनी खेळावर सुरेख नियंत्रणही राखले होते.
जर्मनीच्या तुलनेत भारतीय खेळाडूंनी अधिक शिस्तबद्ध खेळ केला होता. शेवटच्या तीन मिनिटात भारताने तिसरा गोल स्वीकारला नसता तर भारतीय संघाने विजय साकारला असता. ही गोष्ट लक्षात घेता ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने या खेळाची पुनरावृत्ती केली, तर विजय मिळविणे अवघड जाणार नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत मिळालेल्या प्रत्येक संधीचा लाभ भारतीय खेळाडूंनी उठवला पाहिजे. पेनल्टी कॉर्नरसारख्या हुकमी संधी त्यांनी वाया घालविणे आत्मघातकी ठरेल. इंग्लंड व न्यूझीलंडविरुद्ध केलेल्या चुका भारतीय संघाने टाळायल्या पाहिजेत. रिक चार्ल्सवर्थसारख्या महान खेळाडूच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलिया संघ खेळत आहे. अर्थात भारतालाही ऑस्ट्रेलियाचे आणखी एक श्रेष्ठ खेळाडू टेरी वॉल्श यांचे मार्गदर्शन लाभले आहे. पण टेरी वॉल्श यांना भारतीय संघाला मोठे यश मिळवून देता आले नाही. त्यामुळे हा सामना वॉल्श वि. चार्ल्सवर्थ असाही रंगणार आहे.
व्ही. आर. रघुनाथ, रुपिंदरपाल सिंग व अमित रोहिदास हे तीन ड्रॅगफ्लिकर्स भारतीय संघात असूनही अपेक्षेइतके यश त्यांना मिळालेले नाही. त्यांच्याकडून कांगारूंविरुद्ध सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे.  नेदरलँड्सविरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने अर्जेटिनावर ६-१ असा दणदणीत विजय मिळविला होता. हा विजय त्यांचे मनोधैर्य उंचावणारा आहे. त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध खेळताना भारतीय खेळाडूंची तारेवरची कसरत ठरणार आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य लढतीत इंग्लंडची बेल्जियमशी गाठ पडेल. जर्मनीपुढे नेदरलँड्सचे तर अर्जेन्टिनासमोर न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे.