थरारक लढतीचा प्रत्यय हॉकीच्या चाहत्यांना भारत आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जर्मनी यांच्यातील सामन्यादरम्यान अनुभवता आला. अखेरच्या मिनिटाला गोल करून भारताने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जर्मनीला सातव्या-आठव्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात ५-४ असा पराभवाचा धक्का दिला. आता जागतिक हॉकी लीग स्पर्धेत भारताला पाचव्या-सहाव्या क्रमांकासाठी शनिवारी होणाऱ्या लढतीत बेल्जियमचा सामना करावा लागेल.
मनदीप सिंगची हॅट्ट्रिक आणि रुपिंदरपाल सिंग याने पेनल्टी कॉर्नरवर रचलेले दोन गोल भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरले. साखळी गटात जर्मनीविरुद्ध ३-३ अशी बरोबरी राखल्यानंतर भारताने ऑलिम्पिक विजेत्यांविरुद्ध सरस कामगिरीची नोंद केली. जर्मनीने ऑलिव्हियर कोर्न (चौथ्या मिनिटाला) आणि थिलो स्ट्रालकोव्हस्की (सहाव्या मिनिटाला) यांच्या गोलांच्या बळावर सुरुवातीलाच आघाडी घेतली होती. बेंजामिन वेस (२७व्या मिनिटाला) याने आणखी एका गोलाची भर घालत जर्मनीला पहिल्या सत्रात ३-१ असे आघाडीवर आणले होते.
जर्मनीने भारताचा बचाव भेदत जयमानांवर दडपण आणले होते. टोबियास हाउकेच्या पासवर कोर्न याने चौथ्या मिनिटालाच जर्मनीला आघाडीवर आणले. दोन मिनिटांनंतर स्ट्रालकोव्हस्कीने पेनल्टी कॉर्नरवर गोल झळकावत जर्मनीला २-० असे आघाडीवर आणले. जर्मनीने आक्रमक खेळ करत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. १८व्या मिनिटाला मनदीपच्या गोलमुळे भारताने खाते खोलले. काही मिनिटांनंतर जर्मनीला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्यावर गोल करण्यात त्यांना अपयश आले. २५व्या मिनिटाला भारताचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने सुरेख कामगिरी करत टोबियास मटानियाने मारलेला फटका पायाने अडवला. २७व्या मिनिटाला फ्लोरियान फचने मारलेला फटका श्रीजेशने परतवून लावल्यानंतर वेस याने परतीच्या फटक्यावर गोल झळकावला.
दुसऱ्या सत्रात भारतीय संघ मात्र लढवय्याप्रमाणे खेळला. योग्य समन्वय आणि सांघिक खेळ करत भारताने जर्मनीच्या बचावपटूंवर दडपण आणण्यास सुरुवात केली. भारताने तीन मिनिटांमध्ये दोन गोल करत सामन्यात बरोबरी साधली. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर रुपिंदरपालने गोल केला. त्यानंतर लगेचच बिरेंद्र लाकरा आणि एस. व्ही. सुनील यांच्या सुरेख कामगिरीवर मनदीपने सामन्यातील दुसरा गोल लगावला.
भारताची कामगिरी उंचावल्यामुळे मेजर ध्यानचंद स्टेडियमवरील उपस्थितांनीही जल्लोष करायला सुरुवात केली. भारताला आणखी दोन प्रयत्नांमध्ये गोल करता आले नाहीत, मात्र ५३व्या मिनिटाला व्ही. आर. रघुनाथच्या क्रॉसवर मनदीपने हॅट्ट्रिक साजरी केली. या गोलमुळे भारताने सामन्यात पहिल्यांदाच ४-३ अशी आघाडी घेतली. पण दोन मिनिटांनंतर हनेर याने गोल करत जर्मनीला बरोबरी मिळवून दिली. सामना संपायला ३० सेकंद शिल्लक असताना मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर रुपिंदरपालने कोणतीही चूक न करता भारताला विजय मिळवून देत चाहत्यांच्या आनंदात भर घातली. त्याआधी झालेल्या सामन्यात बेल्जियमने अर्जेटिनाला पेनल्टी-शूटआऊटमध्ये ३-१ असे हरवले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jan 2014 रोजी प्रकाशित
थरारक! अखेरच्या क्षणी भारताची ऑलिम्पिक विजेत्या जर्मनीवर मात
थरारक लढतीचा प्रत्यय हॉकीच्या चाहत्यांना भारत आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जर्मनी यांच्यातील सामन्यादरम्यान अनुभवता आला.
First published on: 18-01-2014 at 02:29 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hockey world league india stun olympic champs germany