मनाऊसमध्ये झेरदान शकिरी नावाचे वादळ घोंगावले. या वादळात होंडुराससारख्या संघाचा अक्षरश: पालापाचोळा झाला. शकिरीच्या शानदार हॅट्ट्रिकच्या बळावर स्वित्र्झलडने होंडुरासवर ३-० अशी आरामात केली आणि बाद फेरीतील आपले स्थान पक्के केले. आता दुसऱ्या फेरीत स्वित्र्झलडपुढे लिओनेल मेस्सीच्या अर्जेटिना संघाचे मोठे आव्हान समोर असेल.
चार वर्षांपूर्वीच्या विश्वचषकात होंडुरासनेच गोलशून्य बरोबरीत रोखल्यामुळे स्वित्र्झलडचे बाद फेरी गाठण्याचे स्वप्न पूर्ण झाले नव्हते. परंतु या वेळी मात्र स्वित्र्झलडच्या शकिरीने पहिल्याच सत्रात दोन गोल नोंदवून प्रतिस्पध्र्याचे धाबे दणाणून सोडले.
स्वित्र्झलडने प्रारंभीपासूनच आक्रमणावर भर दिला. बायर्न म्युनिकचा मध्यरक्षक शकिरीने सहाव्या मिनिटालाच संघाचे खाते उघडले. त्यानंतर ३१व्या मिनिटाला दुसरा गोल झळकावला. प्रशिक्षक लुइस सुआरेझ यांच्या मार्गदर्शनाखालील होंडुरास संघाने दुसऱ्या सत्रात सामना वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. परंतु शकिरीने ७१व्या मिनिटाला तिसरा गोल नोंदवल्यानंतर त्यांच्या विजयाच्या आशा मावळल्या.
फिफाच्या क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या ओटमार हिट्झफिल्डच्या मार्गदर्शनाखालील स्वित्र्झलडला पुढील फेरीत जाण्यासाठी विजयाची आवश्यकता होती, तसेच इक्वेडोरचा फ्रान्सविरुद्ध पराभव किंवा बरोबरी होणे आवश्यक होते. पण ही सारी समीकरणे स्वित्र्झलडसाठी जुळून आली. विश्वचषक फुटबॉल स्पध्रेत दोन किंवा त्याहून अधिक गोल झळकावणारा शकिरी हा १९५४नंतर पहिला खेळाडू ठरला आहे.