Hong Kong Open Badminton – या स्पर्धेत आज भारताच्या पारुपल्ली कश्यपने पुरुष एकेरीमध्ये तर सात्विकसाईराज रेकिरेड्डी-अश्विनी पोनप्पा जोडीने मिश्र दुहेरीमध्ये विजयी सलामी दिली. पारुपल्ली कश्यपने चिनी तैपेईच्या सू जेन हाव याला पात्रता फेरीत पराभूत केले. मंगळवारी झालेल्या या सामन्यात कश्यपने पहिला गेम २१-७ असा जिंकला होता. पण पुढच्या गेममध्ये हावने पुनरागमन केले. त्याने तो गेम १२-२१ असा जिंकला. त्यामुळे तिसरा गेम निर्णायक ठरला. या गेममध्ये खेळ अटीतटीचा झाला. अखेर केवळ ३ गुणांच्या फरकाने कॅश्यपने तिसरा गेम २१-१८ असा जिंकला आणि पुढील फेरीत प्रवेश केला. त्याचा पुढील सामना ७व्या मानांकित इंडोनेशियाच्या अँथनी सिनीसुका गिंटिंग याच्याशी होणार आहे.
दुसरीकडे, मिश्र दुहेरीच्या गटात भारताच्या सात्विकसाईराज रेकिरेड्डी-अश्विनी पोनप्पा या जोडीनेही चिनी तैपेईच्या जोडीला धूळ चारली. त्यांनी वांग ची-लीन आणि ली चिआ सिन या जोडीला २१-१६, १९-२१, २१-१४ असे पराभूत केले. पहिला गेम भारतीय जोडीने २१-१६ असा जिंकला. दुसरा गेमही भारतीय जोडी जिंकू शकली असती, पण मोक्याच्या क्षणी चिनी तैपेई जोडीने २ गुण मिळवत तो गेम २१-१९ असा जिंकला. पण अखेरच्या गेममध्ये मात्र भारतीय जोडीने अनुभव पणाला लावत गेम सहज जिंकला आणि पुढील फेरीत धडक मारली. त्यांचा पुढचा सामना तैवानच्या ली यांग आणि सू या चिंग या जोडीशी होणार आहे.