न्यूझीलंड संघाची स्टार महिला क्रिकेटपटू सोफी डिवायन ही आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडमध्ये ओटागो आणि वेलिंग्टन महिला संघात एक सामना खेळण्यात आला. या सामन्यात वेलिंग्टन संघाच्या सोफी डिवायनने आक्रमक फलंदाजी करत ३८ चेंडूत १०८ धावा कुटल्या. तिने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ९ षटकारांची आतषबाजी केली. सोफीने मारलेला एक षटकार थोडासा नकारात्मक कारणामुळे चर्चेत आला.

सोफीने लगावलेला एक षटकार स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका चिमुरीच्या डोक्याला लागला. दुखापत फारशी गंभीर नव्हती परंतु मुलगी अगदीच लहान होती, त्यामुळे तिला होणाऱ्या वेदना जास्त होत्या. सोफीने हा प्रकार पाहिला. महत्त्वाची बाब म्हणजे, सामना संपल्यानंतर सोफीने जे केलं त्या कृत्याची खूपच सकारात्मक चर्चा झाली.

सामना संपल्यानंतर सोफी डिवायन चेंडू लागलेल्या मुलीकडे गेली. तिने अतिशय प्रेमाने त्या चिमुरडीची चौकशी केली. त्यानंतर सोफीने आपली टोपी त्या मुलीला दिली. तसेच त्या छोट्या मुलीसोबत काही फोटो काढले.

या सर्व घटनेचा व्हिडिओ न्यूझीलंड महिला संघाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून सारेच सोफीची स्तुती करताना दिसत आहेत.