How can India still reach Asia Cup 2022 final: मागील आठवड्यामध्ये भारत आशिया चषकाच्या सुपर फोर टप्प्यात पोहचल्यानंतर सोशल मीडियावर भारताच्या सलग १४ विजयांबद्दल क्रिकेट चाहत्यांनी रोहित शर्मा आणि कंपनीचं भरभरुन कौतुक केलं होतं. आशिया चषकामधील मागील चार पर्वांमधील या अभिमानास्पद कामगिरीला मागील दोन सामन्यांनी ग्रहण लावलं आहे. २०१४ नंतर पाहिल्यांदाच भारताचा या मालिकेत सलग दुसऱ्या सामन्यात पराभव झाला आहे. या परभवांमुळे भारत या स्पर्धेमधून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी भारतीय संघाला पाकिस्तानच्या संघाने पाच गडी राखून पराभूत केलं तर मंगळवारी श्रीलंकेच्या संघाने भारताला सहा गाडी राखून पराभूत करत अंतिम फेरीचं तिकीट निश्चित केलं. मात्र आता भारतीय संघाला अंतिम सामन्यात घेऊन जाण्याचं काम पाकिस्तानचा संघच करु शकतो. सलग दुसऱ्या पराभवानंतर भारतासाठी अंतिम सामन्याची समिकरणं कशी आहेत पाहूयात…
मंगळवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर भारत आणि श्रीलंका सामन्याचा जो निकाल लागला तो अनेकांना अगदीच अनपेक्षित होता. स्पर्धेच्या सुरुवातीला अडखळणाऱ्या श्रीलंकने दमदार पुनरागमन केलं. बंगलादेशविरुद्ध अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवत सुपर फोरमध्ये आलेला श्रीलंकेचा संघ अंतिम सामन्यात पोहचलेला पहिला संघ ठरला आहे. देशातील अस्थिरता आणि एकंदरित परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकन संघासाठी हा विजय फार महत्त्वाचा आहे. एकीकडे श्रीलंकेने अंतिम फेरीत मजल मारली असली तरी दुसरीकडे सलग दुसऱ्या पराभवामुळे भारताची वाट अवघड झाली असून पुढील प्रवासासाठी भारताला मुख्यपणे पाकिस्तानवर अवलंबून रहावं लागणार आहे. मुळात भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश हा चार महत्त्वाच्या मुद्द्यावर अवलंबून आहे. ते मुद्दे खालील प्रमाणे…
१) अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभूत करणे
२) भारताने अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत करणे
३) श्रीलंकेने पाकिस्तानला पराभूत करणे
४) या तीन महत्त्वाच्या निकालांबरोबरच सुपर फोरमधील सर्व सामने संपल्यानंतर भारताचं नेट रनरेट हे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानपेक्षा अधिक असायला हवं.
१० महिन्यांपूर्वीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती जेव्हा टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये अफगाणिस्तानच्या कामगिरीवर भारत अवलंबून होता. अफगाणिस्तानच्या संघांने न्यूझीलंडला पराभूत केलं असतं तर भारताचा या स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला नसता. अफगाणिस्तानला तेव्हा जे शक्य झालं नाही आता ते त्यांनी पाकिस्तानविरुद्ध करावं अशी भारतीयांची अपेक्षा असेल. पाकिस्तानने एक जरी सामना जिंकला तरी भारत या स्पर्धेमधून बाहेर पडेल.
अफगाणिस्तानचा संघ श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाला तर पाकिस्तान आणि श्रीलंका असा अंतिम सामना होईल. अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभूत केलं तर भारताला अफगाणिस्तानविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी श्रीलंकेवर अवलंबून रहावं लागेल. श्रीलंकेने आपली विजयी घौडदौड सुरु ठेवत पाकिस्तानला पराभूत केलं तर अंतिम सामन्यात श्रीलंकन संघ पुन्हा एकदा भारताविरुद्ध मैदानात उतरेल.