जून २०२४ मध्ये आसीसीचा टी-२० विश्वचषक होणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहते या विश्वचषकाची वाट पाहत आहेत. १ जून ते २९ जून २०२४ दरम्यान होणाऱ्या विश्वचषकासाठी तिकीट विक्री सुरू झाली आहे. यासाठी पब्लिक बॅलेट ही पद्धत आसीसीकडून अवलंबण्यात आली आहे. या पद्धतीनुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. यावेळचा विश्वचषक खास असण्याचे कारण म्हणजे एकूण नऊ शहरांमध्ये ५५ सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी तीन शहरं युनायटेड स्टेट्समधील असून कॅरेबियन देशातील सहा शहरांचा समावेश आहे.
अमेरिकेत भारतीय नागरिकांची संख्या पाहता, तिकीट विक्रीत पारदर्शकता असावी याकारणासाठी ही पद्धत आचरण्यात आली आहे. क्रिकेट सामन्याचा प्रत्यक्ष मैदानावर आनंद घेण्याची समान संधी प्रत्येक चाहत्याला मिळावी, असा यामागचा हेतू आहे. ७ फेब्रुवारीपर्यंत तिकीट विक्री केली जाणार असून तिकिटांचे दर कसे असतील, याची माहिती टी-२० वर्ल्डकपच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
वरील संकेतस्थळावर जाऊन चाहत्यांना प्रत्येक सामन्याचे आागाऊ तिकीट विकत घेता येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर तिकीट विक्री होईल. एका चाहत्याला अधिकाधिक सहा तिकीटे विकत घेण्याची मुभा आहे. एक चाहता कितीही तिकीटे विकत घेऊ शकतो, असे नियम संकेतस्थळावर नमूद केले आहेत.
सर्व आर्थिक गटातील चाहत्यांना क्रिकेटचे सामने पाहता यावेत, यासाठी सामन्याच्या तिकिटाचे दर काळजीपूर्वक ठरविले गेले आहेत. सहा डॉलरपासून तिकिटाची सुरुवात होते, ती जास्तीत जास्त २५ डॉलरपर्यंत ठेवण्यात आली आहे. पब्लिक बॅलेटमध्ये जी तिकीटे विकली जाणार नाहीत. त्याची विक्री २२ फेब्रुवारी रोजी अधिकृत संकेतस्थळावर केली जाईल.
भारत-पाकिस्तान सामन्यासाठी तिकिटाचे दर काय?
भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्याची उत्सुकता अनेकांना असते. दोन्ही देशांचे चाहते जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी त्यांना हा सामना थेट पाहण्याची उत्सुकता लागलेली असते. ९ जून रोजी न्यूयॉर्कमधील नस्साउ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये भारत वि. पाकिस्तानचा सामना होणार आहे. या सामन्यासाठी सामान्य (स्टँडर्ड) श्रेणीसाठी तिकिटाचे दर १४,५०० रुपये (भारतीय रुपयांमध्ये) आहेत. स्टँडर्ड प्लस श्रेणीसाठी २४,८६३ रुपये आणि प्रिमियम श्रेणीसाठी ३३,१४८ रुपये दर असल्याचे कळते.
भारताचे सामने कधी होणार?
भारत वि. आयर्लंड – ५ जून, न्यूयॉर्क
भारत वि. पाकिस्तान – ९ जून, न्यूयॉर्क
भारत वि. यूएसए – १२ जून, न्यूयॉर्क
भारत वि. कॅनडा – १५ जून, फ्लोरिडा