बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय याचे मनोगत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीन, जपान आदी देशांच्या खेळाडूंचे मानसिक दडपण आमच्यावर असायचे. मात्र सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू यांनी चीन, जपानसह सर्वच प्रथितयश देशांच्या खेळाडूंवर अनेक वेळा मात केल्यामुळे आमच्यात सकारात्मक वृत्ती निर्माण झाली, असे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय याने सांगितले.

‘‘जागतिक स्तरावर माझ्याबरोबरच पारुपल्ली कश्यप, अजय जयराम आदी खेळाडूंना पुरुष गटात अन्य देशांची मक्तेदारी संपवण्यात यश मिळाले आहे. अन्य देशांच्या खेळाडूंना आमच्या कामगिरीची दखल घ्यावी लागत आहे. आम्ही अनेक बलाढय़ खेळाडूंवर मात करीत आहोत. याचे श्रेय सायना व सिंधू यांच्याकडे जाते,’’ असे प्रणॉय याने सांगितले.

तो पुढे म्हणाला, ‘‘जागतिक सुपर सीरिज स्पर्धामध्ये मी प्रथमच भाग घेतला होता. त्या वेळी अनेक मोठे मोठे खेळाडू पाहून आपल्याला त्यांच्याबरोबर खेळण्याची संधी मिळणार का, असा प्रश्न आमच्या मनात येत असे. आता आम्हाला नेहमीच त्यांच्याशी सामना खेळण्याची संधी मिळत आहे आणि आम्ही त्यांना पराभूत करीत आहोत. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये अनेक भारतीय खेळाडू विविध वयोगटात आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करू लागले आहेत. हा बॅडमिंटन क्षेत्रात झालेला मोठा बदल आहे.’’ ‘‘आम्ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेत होतो, तेव्हा पदक मिळवणे शक्य नसल्यामुळे त्याबाबत फारसा विचार मनात येत नसे. ऑलिम्पिकचे स्मृतिचिन्ह मिळाले की आम्हाला समाधान वाटत असे. आता आपल्या खेळाडूंचा दर्जा उंचावला आहे. ते ऑलिम्पिक पदक मिळवू लागले आहेत व त्याबाबत सकारात्मक विचार करू लागले आहेत ही आनंददायी गोष्ट आहे,’’ असे राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hs prannoy credits saina nehwal and pv sindhu for mindset change
First published on: 19-02-2018 at 02:04 IST