‘आय-लीग’ ही भारतातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठेची फुटबॉल स्पर्धा. व्यापारी समीकरणात अपयशी ठरल्याने ही अख्खी लीगच इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) विलीन करण्याचा प्रस्ताव अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) विचाराधीन आहे. आय-लीगमधून पुण्यातील दोन प्रमुख संघ माघार घेण्याच्या मार्गावर असताना एआयएफएफने या खेळातील विकासासाठी आराखडा तयार केला असून येत्या काही वर्षांत केवळ एकच लीग खेळविण्यात तयारीत आहेत. त्यामुळे पुढील तीन-चार वर्षांमध्ये आय-लीगचा गाशा गुंडाळला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
फुटबॉल चाहत्यांना आकृष्ट करण्यात तसेच कॉर्पोरेट उद्योगसमूहांना स्पर्धेसाठी पैसा उभारण्यासाठी उद्युक्त करू न शकल्याने आय-लीग स्पर्धेला घरघर लागली आहे. मात्र त्याचवेळी आक्रमक विपणन प्रणालीच्या जोरावर पहिल्याच हंगामात आयएसएल स्पर्धेने फुटबॉल चाहत्यांवर गारुड घातले. प्रतिवर्षी आय-लीगमधल क्लबला बसणारा आर्थिक फटका, यामुळे या स्पध्रेचे महत्त्व कमी होत चालले आहे. त्यामुळे पुणे एफसी आणि गतवर्षी आयलीगच्या चमूत दाखल झालेल्या भारत एफसी संघाने माघार घेण्याचा मार्ग निवडला आहे. तसेच या दोन्ही क्लबने विलीन होऊन आयएसएलमध्ये एक संघ उतरवण्याची तयारीही सुरू केली आहे.
एआयएफएफचे सरचिटणीस कुशल दास यांनीही येत्या दोन किंवा तीन वर्षांत देशात एकच लीग खेळविण्यात येणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ‘‘येत्या दोन ते तीन वर्षांत एकच लीग स्पर्धा खेळविण्याचा आराखडा आम्ही तयार केला आहे, परंतु याची अंमलबजावणी कशा प्रकारे करता येईल, हे तपासायला हवे. भारतीय फुटबॉलमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने हे पाऊल असेल. ही त्वरित प्रक्रिया नसली तरी भविष्यात हे घडू शकते. आयएसएल आणि आय-लीग क्लब मधील बरेचसे संघ आणि आयएमजी रिलायन्स यांना एकच लीग खेळविण्यात यावी असे वाटत आहे.’’
ते म्हणाले, ‘‘आयएसएलचा हंगाम संपल्यानंतर जानेवारीत आय-लीगला सुरुवात होणार आहे. त्यामुळे
आय-लीगवर कोणतेही संकट नाही. दोन संघांनी माघार घेण्याच्या निर्णयामुळे असे घडत आहे, असे वाटत नाही. अधिकृतरीत्या त्यांनी हे कळवले नसले तरी एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल पटेल भारत एफसी आणि पुणे एफसी संघांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत. पुण्यातून तीन संघ खेळत असल्यामुळे त्यांना प्रेक्षकांचा पाठबळ मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I league football shutdown
First published on: 23-08-2015 at 12:58 IST