‘‘परिश्रम करून जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल शंभर खेळाडूंमध्ये स्थान पटकावले होते, त्याचा आनंद आहे. कामगिरीत जशी सुधारणा होईल, तशी क्रमवारीत सकारात्मक वाटचाल होईल. क्रमवारीतील स्थान, आकडय़ांचे खेळ, विक्रम, जेतेपदे महत्त्वाची आहेतच; पण युवा खेळांडूसमोर चांगला आदर्श निर्माण करू शकलो तर त्याचे समाधान जास्त असेल,’’ असे मत भारताचा अव्वल टेनिसपटू युकी भांब्रीने व्यक्त केले. पुण्यात चालू असलेल्या एटीपी चॅलेंजर स्पध्रेत युकी खेळतो आहे. कारकीर्दीतील हा टप्पा, खडतर वाटचाल, खेळात केलेले बदल, व्यवस्थेचा अभाव याविषयी युकीशी केलेली बातचीत –
ल्ल २०१० नंतर जागतिक क्रमवारीत अव्वल शंभरांत स्थान पटकावणारा तू पहिलाच भारतीय खेळाडू आहेस. याबद्दल काय सांगशील?
प्रचंड आनंद झाला. एक वर्तुळ पूर्ण केल्याची भावना मनात आहे. वर्षांच्या सुरुवातीला मी क्रमवारीत अव्वल चारशे खेळाडूंमध्ये नव्हतो. तिथून वर्ष पूर्ण होण्याआधी अव्वल शंभरांत स्थान गाठणे, हे समाधान देणारे आहे. पाश्चिमात्य देशांसाठी अव्वल १० किंवा २०मध्ये किती खेळाडू हा निकष असतो. आपल्या बाबतीत विचार करताना संदर्भ लक्षात घ्यायला हवा. अगदी आतापर्यंत अव्वल चारशे जणांमध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच खेळाडू आपले होते. पण आता अव्वल तीनशेमध्ये पाच भारतीय आहेत. कामगिरीत सुधारणा झाली, तर साहजिकच आगेकूच होईल. पण मुळात भारतीय खेळाडू हा टप्पा गाठू शकतात, हा विश्वास या यशाने दिला आहे. गणितीय समीकरणांमुळे सध्या १०५ व्या स्थानी आहे. निश्चितच पुन्हा अव्वल शंभर खेळाडूंमध्ये असेन.
ल्ल तू २००९ मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँड स्लॅम स्पध्रेत कनिष्ठ गटात जेतेपदाची कमाई केली होतीस. तिथून आतापर्यंतच्या वाटचालीचे वर्णन कसे करशील?
त्या जेतेपदाने ओळख निर्माण झाली आणि अपेक्षा वाढल्या, परंतु वरिष्ठ गटात प्रचंड स्पर्धा असते, याची मला कल्पना होती. एकेका क्रमवारी गुणासाठी जगाच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या ठिकाणी स्पध्रेसाठी जावे लागते. तिथल्या वातावरणाशी जुळवून घेईपर्यंत पात्रता फेरीत पराभव होतो आणि गाशा गुंडाळावा लागतो. पुढची स्पर्धा आणखी दूर असते आणि तिथे पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. एखादा फटका यशाचे गणित बिघडवतो. जेतेपद मोठय़ा प्रयत्नाचे मूर्त स्वरूप असते. जेतेपद मिळवता आले नाही की हे प्रयत्न उपेक्षित राहतात. माझ्याबाबतीत विविध स्वरूपाच्या दुखापतींनी सातत्याने त्रास दिल्याने वाटचाल कठीण होती.
ल्ल यंदाच्या हंगामात खेळात जाणीवपूर्वक काही बदल केलेस का?
अमेरिकेचे माजी टेनिसपटू टेलर डेंट यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या सíव्हसमध्ये थोडा बदल केला. सíव्हसमधील अचूकता वाढल्याने मला फायदा झाला. त्याशिवाय कोणत्या स्पर्धा खेळायच्या आणि कधी विश्रांती घ्याची, याचे रीतसर वेळापत्रक तयार केले. दुहेरीतील सहभाग टाळून एकेरीवर लक्ष केंद्रित केले.
ल्ल सध्याचे टेनिसपटू आक्रमक, भावना प्रदíशत करणारे आहेत. चच्रेत राहण्यासाठी विविध क्लृप्त्या ते करीत असतात. तू मात्र शांत आणि टेनिसकेंद्रित असतोस?
क्रीडापटू समाजाचा महत्त्वाचा घटक असतो. देशाचे प्रतिनिधित्व करण्याची त्याला संधी मिळते. या संधीबरोबर जबाबदारीही येते. केवळ युवा वर्ग नव्हे, तर बहुसंख्य जण त्यांना पाहत असतात. युवा वर्गासाठी अव्वल खेळाडू अनुकरणीय होतात. त्यामुळे खेळताना, वावरताना भान राखणे आवश्यक आहे. प्रसिद्धीलोलुपता झटपट प्रकाशझोतात ठेवू शकते, पण महान खेळाडू केवळ त्यांच्या खेळासाठी नव्हे, तर त्यांच्या वर्तनासाठी, नम्र स्वभावासाठी ओळखले जातात. असा चांगला आदर्श निर्माण करणे हे माझे उद्दिष्ट आहे. घरच्या संस्कारांमुळे यश डोक्यात जात नाही.
ल्ल ग्रँड स्लॅम लढतीचा दिवाणखाण्यात बसून आनंद लुटणे आपल्याला आवडते. आपण पाहण्यात समाधानी आहोत असे वाटते का?
टेनिसपटू घडण्यासाठी देशात वातावरण नाही. पायाभूत सुविधा, प्रशिक्षक, ट्रेनर असा सर्वसमावेशक विचारच कोणी करीत नाही. सद्य:स्थितीला चांगली कामगिरी करणारे बहुतांशी भारतीय खेळाडू अमेरिकेतील कॉलेज टेनिस संस्कृतीमुळे घडले आहेत. आíथक क्षमता असणारे खेळाडू विदेशात प्रशिक्षण घेतात. मी भारतीय व्यवस्थेत वाढलो. त्यामुळेच कदाचित अव्वल शंभरी गाठण्यासाठी वेळ लागला. चांगल्या सरावासाठी तुल्यबळ असा प्रतिस्पर्धी मिळणेही कठीण आहे. संघटनात्मक पातळीवर अनास्था आहे. ग्रँड स्लॅम विजेता होण्यामागच्या मेहनतीकडे आपण दुर्लक्ष करतो.

स्वप्ने जरूर पाहावीत, पण त्याला वास्तवाची किनार असावी. ग्रँड स्लॅम जेतेपदासाठी खेळाडू आयुष्य खर्ची घालतो. मलाही ग्रँड स्लॅम जिंकायचे आहे. पण त्यासाठी वेळ लागेल. कामगिरीत प्रचंड सुधारणा आवश्यक आहे. पीळदार शरीरयष्टी आणि ताकदवान खेळ हा सध्या प्रचलित आहे. भारतीय खेळाडूंकडे कौशल्य असते, पण तंदुरुस्ती आणि ताकदीत ते कमी पडतात. शक्ती आणि युक्तीचा मेळ घालणे गरजेचे आहे.