चॅम्पियन्स करंडक २०१७ च्या स्पर्धेत मोठमोठ्या संघाना धक्का देण्याचं काम पाकिस्तानी संघाने कायम ठेवलंय. उपांत्य फेरीत पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिल्यानंतर अंतिम फेरीत पाकिस्तानने भारतावर तब्बल १८० धावांनी मात करत चॅम्पियन्स करंडकावर आपलं नाव कोरलं आहे. अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताला ३३९ धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाटलाग करता करता भारताचा संघ १५८ धावांत गुंडाळला गेला.
पाकिस्तानने अंतिम सामन्यात गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्व डिपार्टमेंटमध्ये उत्तम कामगिरी करत सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली. एकीकडे पाकिस्तान अष्टपैलू काम करत असताना भारतीय संघ आणि कर्णधार विराट कोहलीने मात्र काही चुका केल्या. या चुका भारतीय संघाने टाळल्या असल्या तर भारत आज चॅम्पियन्स करंडक जिंकू शकला असता.
१) गोलंदाजांची सुमार कामगिरी – संपूर्ण स्पर्धेत चिंतेचा विषय ठरलेली भारताची गोलंदाजी अंतिम सामन्यातही पुन्हा एकदा आपल्या मूळ पदावर आली. भुवनेश्वर कुमार आणि हार्दीक पांड्याचा अपवाद वगळता प्रत्येक गोलंदाजांनी आज निराशा केली. जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा यांनी अत्यंत स्वैर मारा करत पाकिस्तानी फलंदाजांना धावा आंदण दिल्या. खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असतानाही सतत फलंदाजांच्या टप्प्यात चेंडु टाकण, फुलटॉस बॉल देण, वाईड-नो बॉल यामुळे भारतीय आक्रमणातली धारच निघून गेली, ज्याचा फायदा पाकिस्तानी फलंदाजांनी पुरेपूर घेतला. भुवनेश्वर कुमारने आपल्यापरीने चांगली गोलंदाजी केली. मात्र मोक्याच्या क्षणी भारताला ब्रेक-थ्रू मिळवून देणं त्यालाही जमलं नाही.
२ ) केदार जाधवचा पडलेला विसर – केदार जाधव नावाचा एक खेळाडू आपल्या संघात आहे हे बहुदा विसरलेला होता. सर्व प्रमुख गोलंदाजांची पिटाई होत असतानाही कर्णधार विराट कोहली त्यात त्याच गोलंदाजांकडून गोलंदाजी करुन घेत राहिला. बांगलादेशविरुद्ध तमिम इक्बाल आणि मश्फिकुर रहीमची जमलेली जोडी केदार जाधवनेच फोडली होती. त्यानंतर अनेक ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी केदार जाधवचा गोलंदाजीत अधिकाधीक वापर करणं गरजेचं असल्याचं बोलून दाखवलं होतं. मात्र अंतिम सामन्यात केदार जाधवला गोलंदाजी द्यायला विराट कोहलीने ४० षटकं वाट बघितली. तोपर्यंत बरंच पाणी पुलाखालून गेलं होतं. तरीही केदार जाधवने आपल्यापरीने प्रयत्न करत एक बळी मिळवला, मात्र त्यालाही नंतर फारसं यश मिळलं नाही. जर केदार जाधवला मधल्या षटकांमध्ये गोलंदाजी मिळाली असती तर सामन्यावर नक्कीच फरक पडला असता.
३) मोक्याच्या क्षणी फलंदाज ढेपाळले – बांगलादेशविरुद्ध भारतीय फलंदाजांनी केलेली कामगिरी पाहता अंतिम फेरीत आपला संघ पुन्हा कमाल करेल असा अंदाज अनेक चाहत्यांनी बांधला होता. मात्र झालं नेमकं याच्या उलटं. पाकिस्तानने उभारलेल्या डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठीच टीम इंडीया दडपण घेऊन मैदानात उतरली. रोहीत शर्मा-शिखर धवनची मैदानावरची देहबोली सर्व काही सांगून जात होती. त्यातच अंतिम सामन्याआधी संघात स्थान मिळालेल्या मोहम्मद आमीरने भारतीय फलंदाजांवर दबाव टाकायला सुरुवात केली, आणि भारतीय फलंदाज अलगद आमीरच्या जाळ्यात अडकले. रोहीत शर्मा, विराट कोहली आणि शिखर धवन या आघाडीच्या फलंदाजांना एकामागोमाग एक तंबूत धाडत भारताच्या फलंदाजीचा कणाच मोडून टाकला. सुरुवातीलाच बसलेल्या या धक्क्यातून भारतीय संघ सावरुच शकला नाही.
४ ) मधल्या फळीचं रडगाणं सुरुच – चॅम्पियन्स करंडकात मधल्या फळीचं रडगाणं अंतिम फेरीत कायम राहिलं. महत्वाच्या सामन्यात आघाडीची फळी लवकर माघारी परतल्यानंतर मधल्या फळीवर संघाला सावरण्याची जबाबदारी असते. मात्र या सामन्यात ही मधली फळी सपशेल अपयशी ठरली. हार्दीक पांड्याचा अपवाद वगळता युवराज सिंह, एमएस धोनी, केदार जाधव, रविंद्र जाडेजा यांनी एकदाही मोठी खेळी उभी करण्याचे प्रयत्न केले नाहीत. पहिले ३ बळी गेल्यानंतरचं दडपण मधल्या फळीनेही घेतलं. फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या धोनीने १६ चेंडुंमध्ये अवघ्या ४ धावा केल्या. मधल्या फळीतील फलंदाजांनी जर जबाबदारीने फलंदाजी करुन एक मोठी भागीदारी रचली असती तर सामन्याचं चित्र पालटू शकलं असतं.
५) पांड्याची विकेट आणि सामना गमावला – हार्दीक पांड्याच्या खेळाने भारतीय संघाच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या होत्या. मधल्या फळीतल्या फलंदाजांची नेमकी जबाबदारी ओळखून पांड्या खेळत होता. मात्र चोरटी धाव घेण्याच्या नादात जाडेजा आणि पांड्या यांच्यातळा ताळमेळ फसला आणि पांड्या धावचीत झाला. ही विकेट भारतासाठी सर्वात जास्त महाग ठरली. हार्दीक पांड्या मैदानात आणखी काही काळ टिकला असता तर सामना भारताच्या बाजुने नक्की फिरला असता.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jun 2017 रोजी प्रकाशित
….. तर भारत जिंकला असता!
चॅम्पियन्स करंडक २०१७ च्या स्पर्धेत मोठमोठ्या संघाना धक्का देण्याचं काम पाकिस्तानी संघाने कायम ठेवलंय. उपांत्य फेरीत पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिल्यानंतर अंतिम फेरीत पाकिस्तानने भारतावर तब्बल १८० धावांनी मात करत चॅम्पियन्स करंडकावर आपलं नाव कोरलं आहे. अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताला ३३९ धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाटलाग करता करता भारताचा संघ १५८ धावांत गुंडाळला गेला. पाकिस्तानने […]
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 18-06-2017 at 23:00 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc champions trophy 2017 5 reasons of india loosing match to pakistan