दमदार नाबाद शतकासह बांगलादेशवर सहज विजय; तमीम इक्बालचे शतक व्यर्थ
प्रतिस्पध्र्याचे आव्हान कितीही कडवे असले तरी शांतचित्ताने आक्रमण हाच उत्तम बचाव असतो, याचा उत्तम वस्तुपाठ इंग्लंडच्या जो रूटने चॅम्पियन्स क्रिकेट करंडक स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दिला. तमीम इक्बालच्या शतकाच्या जोरावर बांगलादेशने इंग्लंडपुढे ३०५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रूटने नाबाद १३३ धावांची खेळी साकारत इंग्लंडला आठ विकेट्स आणि १६ चेंडू राखत सहज विजय मिळवून दिला.
इंग्लंडने नाणेफेक जिंकत बांगलादेशला फलंदाजीसाठी पाचारण केले. बांगलादेशच्या सलामीवीरांनी संयमी सुरुवात केली. शतकाची वेस ओलांडण्यापूर्वी बांगलादेशने दोन फलंदाज गमावले. पण दुसऱ्या टोकाकडून अप्रतिम फलंदाजीचा नमुना इक्बाल पेश करत होता. कोणतीही जोखीम न उचलता इक्बालने मोठी खेळी साकारण्याच्या दृष्टीने एकेरी-दुहेरी धावांवर अधिक भर दिला. लायम प्लंकेटच्या २२व्या षटकात सातवा चौकार लगावत इक्बालने अर्धशतक पूर्ण केले. या वेळी त्याला सुयोग्य साथ मिळाली ती रहिमची. या दोघांनी इंग्लंडची गोलंदाजी बोथट करत तिसऱ्या विकेटसाठी १६६ धावांची भागीदारी रचली. मोइन अलीच्या ३९व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर एकेरी धाव घेत इक्बालने शतक पूर्ण केले. शतक पूर्ण केल्यावर इक्बाल अधिक आक्रमक झाला आणि मोठा फटका मारण्याच्या नादात प्लंकेटच्या गोलंदाजीवर बाद झाला. इक्बालने १२ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने १२८ धावांची खेळी साकारली. इक्बाल बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर रहिमने मोठा फटका मारत आत्मघात केला. कारण इक्बाल बाद झाल्यावर रहिमने सामन्याची सूत्रे हातात घेणे अपेक्षित होते आणि त्यामध्ये तो सपशेल अपयशी ठरला. रहिमने आठ चौकारांच्या जोरावर ७९ धावा केल्या. अखेरच्या षटकांमध्ये बांगलादेशच्या फलंदाजांनी धावा फुगवत संघाला तीनशे धावांचा पल्ला गाठून दिला. इंग्लंडकडून लायम प्लंकेटने चार बळी मिळवले.
बांगलादेशच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला तिसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. पण त्यानंतर रूट आणि अॅलेक्स हेल्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी १६५ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाला विजयासमीप पोहोचवले. हेल्सने ८६ चेंडूंत ११ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ९५ धावा केल्या. हेल्स बाद झाल्यावर रूटने कर्णधार ईऑन मॉर्गनच्या (नाबाद ७५) साथीने तिसऱ्या विकेटसाठी १४३ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ‘फलंदाजीचा कणा’ ही बिरुदावली सार्थ असल्याचे रूटने या सामन्यात शतक झळकावून दाखवून दिले. रूटने १२९ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद १३३ धावांची खेळी साकारली.