चॅम्पियन्स ट्रॉफीतील उपांत्य लढतीत भारतानं बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला. या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन देशभर सुरू आहे. विराटच्या आक्रमक नेतृत्त्वाखाली टीम इंडियाचे खेळाडू जबरदस्त कामगिरी करत आहेत. त्याचं कौतुकही होत आहे. बांगलादेशविरुद्धच्या लढतीतही विराट अधिक आक्रमक दिसला. पण संघाचं नेतृत्त्व करताना विराटचाही कधी-कधी संयम सुटतो. बांगलादेशच्या फलंदाजाला धावबाद करण्याच्या प्रयत्नात धोनीकडून अतिरिक्त पाच धावा गेल्या. ही ‘चूक’ विराटला खटकली आणि त्यानं आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली.

चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत-बांगलादेश यांच्यातील ‘हाय व्होल्टेज’ सामन्यात भारतानं जबरा खेळ केला आणि बांगलादेशच्या ‘शेरां’ना ढेर केलं. भारतानं बांगलादेशला स्पर्धेबाहेर काढून बांगलादेशच्या उतावीळ चाहत्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. या सामन्यात भारतीय संघाचे खेळाडू जरा जास्तच आक्रमक दिसले. खेळही त्यांनी आक्रमकच केला. त्यात कॅप्टन कोहली आघाडीवर होता, असं म्हणता येईल. केदार जाधवच्या गोलंदाजीवर बांगलादेशच्या फलंदाजाचा अप्रतिम झेल टिपल्यानंतर कोहलीनं केलेला जल्लोष अधिक लक्षात राहिला. पण धोनीकडून ‘चूक’ झाल्यानंतर विराटनं व्यक्त केलेली नाराजी त्याहीपेक्षा अधिक लक्षात राहिली. प्रत्येक वेळी मी धोनीसरांचा सल्ला घेतो असं सांगणारा कोहली धोनीवर कमालीचा चिडला. बांगलादेश प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. अश्विननं ४०वे षटक टाकले. या षटकात बांगलादेशच्या फलंदाजानं टोलवलेला चेंडू युवराजकडं गेला. त्यानं विकेटकीपर धोनीकडं थ्रो केला. धोनीनं बांगलादेश फलंदाजाला धावबाद करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न फसला. धोनीनं स्टम्पवर फेकलेला चेंडू तेथे ग्लोव्हजवर लागला आणि बांगलादेशला अतिरिक्त पाच धावांचं बक्षीस मिळालं. बांगलादेशचे फलंदाज खोऱ्यानं धावा वसूल करत होते. अशात पाच धावा अतिरिक्त गेल्यानं कॅप्टन विराट संतापला. धोनीकडं पाहून त्यानं आपला राग व्यक्त केला. तो काहीतरी पुटपुटला. मी धोनीकडून कायम सल्ला घेतो, असं म्हणणाऱ्या कोहलीनं राग व्यक्त केल्यानंतर धोनीचे चाहते मात्र नाराज झाले आहेत, असं दिसतं.