भारत आणि पाकिस्तान यांच्यात ओव्हल मैदानावर सुरु असणाऱ्या सामन्यात भारतीय संघाला विक्रमी खेळी करण्याची गरज आहे. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी ३३९ धावांचे आव्हान ठेवले आहे. यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०१२ मध्ये रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने ३२९ धावांचे आव्हान परतवून लावण्याचा करिश्मा केला होता. या सामन्याची पुनरावृत्ती करत भारतीय संघाला हे आव्हान पेलावे लागणार आहे. या सामन्यात गौतम गंभीर शून्यावर बाद झाल्यानंतर सचिन तेंडुलकरने अर्धशतकी खेळी केली होती. तर विराट कोहलीने १८३ धावांची खेळी केली होती. मात्र सद्य परिस्थितीत भारतीय संघ मोठ्या संकटात सापडल्याचे दिसते. रोहित शर्मा शून्यावर बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली देखील तंबूत परतला आहे. त्यामुळे चॅम्पियन्स करंडकावर नाव कोरण्यासाठी कोणता फलंदाज पाकिस्तानी गोलंदाजांच्या माऱ्याला परतवून लावण्यात यशस्वी होईल? असा प्रश्न तमाम क्रिकेट चाहत्यांना सतावत आहे.
यंदाच्या स्पर्धेत ओव्हलच्या मैदानात भारतीय संघाने दिलेले ३२२ धावांचे आव्हान परतवून लावत श्रीलंकेने या मैदानावर धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम आपल्या नावे केला होता. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करुन एका नव्या विक्रम प्रस्थापित करण्याचे भारतीय संघासमोर आव्हान असेल. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताच्या मध्य फळीतील फलंदाजांना फारशी संधी मिळालेली नाही. मात्र, आज भारतीय संघाच्या पहिल्या दोन विकेट्स लवकर पडल्यामुळे मध्यफळीतील फलंदाजांची कसोटी असेल.
ओव्हलच्या मैदानात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात रंगलेल्या सामन्यात सर्वोधिक धावांची बरसात झाल्याचे पाहायला मिळाले होते. १२ जून २०१५ मध्ये न्यूझीलंडने निर्धारित ५० षटकात तब्बल ३९८ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरादाखल इंग्लंडने या सामन्यात ४६ षटकात ९ बाद ३६५ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडने हा सामना १३ धावांनी जिंकला होता. या मैदानातील मोठ्या धावसंख्येचा इतिहास पाहता भारतीय संघासाठी ३३९ धावांचे लक्ष्य फार कठीण नाही मात्र, यासाठी फलंदाजांनी मैदानात तग धरण्याची गरज आहे.