|| चंद्रकांत पंडित

भारत आणि इंग्लंड सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता; परंतु इंग्लंडसाठी ‘करो या मरो’ अशी परिस्थिती होती. पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी हा सामना जिंकणे, इंग्लंडसाठी महत्त्वाचे होते. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी निवडल्यामुळे सामन्याच्या सुरुवातीलाच इंग्लंडचे पारडे जड झालेले दिसले.

जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थकी लावला. १६० धावांची सलामीची भागीदारी खेळात वारंवार बघायला मिळत नाही. बेअरस्टोने सामन्यात राखलेले वर्चस्व आणि दुसऱ्या बाजूला जेसन रॉयने दिलेली साथ यामुळे इतकी मोठी भागीदारी झाली. बेअरस्टो सुरुवातीला नशीबवान ठरला. त्याच वेळी मला वाटले की, आज त्याचा दिवस आहे आणि तो या संधीचा फायदा घेणार. ‘आज हा दही खाऊन आला आहे’ असे मराठीत याबाबत म्हटले जाते. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांच्या गोलंदाजीला तो थोडासा चाचपडलेला दिसला तरी त्यातून बाहेर पडल्यावर आपल्या फलंदाजीचा दर्जा त्याने दाखवला. सामन्यात सुरुवातीला ज्याला जीवनदान मिळते, तो पुढे चांगली कामगिरी करतो, असे खेळात बऱ्याचदा झाले आहे. तेच कदाचित बेअरस्टोच्या बाबतीत घडले. बेअरस्टो आणि रॉय यांनी मिळून संघासाठी चांगली सुरुवात करून दिली. त्या वेळी इंग्लंडचा संघ ३५०-३७५ धावसंख्येपर्यंत सहज मजल मारू शकेल असे वाटले होते. बेअरस्टो जेव्हा बाद झाला, तेव्हा लगेचच भारतीय गोलंदाजांनी सामन्यावरील आपले वर्चस्व दाखवत इंग्लंडच्या फलंदाजांसाठी गतिरोधक टाकले; परंतु जो रूट, बेन स्टोक्स या दोन्ही फलंदाजांनी इंग्लडला ३३७ धावांपर्यंत पोहोचवले. ३३८ ही धावसंख्या भारतासाठी या खेळपट्टीवर करणे जास्त आव्हानात्मक नव्हते. याआधीही भारताने ३००-३५० धावांचा पाठलाग केला आहे.

शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळे विश्वचषक मध्यातच सोडण्याची वेळ आली, परंतु त्यामुळे भारताच्या फलंदाजांचा क्रम बदलला आणि चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूला आपली कामगिरी चोख बजावता न आल्यामुळे भारताची धावसंख्या कोलमडली. चौथ्या क्रमांकावरचा फलंदाज ही अजूनही भारतासाठी चिंतेची गोष्ट आहे. नवा फलंदाज ऋषभ पंतला चौथ्या क्रमांकावर खेळायला पाठवणे, ही नक्कीच आश्चर्याची गोष्ट होती. फलंदाजीमध्ये त्याने आत्तापर्यंत कधीही चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी केली नाही. त्याची ट्वेन्टी-२० आणि काही कसोटी सामन्यांतील कामगिरी बघून संघ व्यवस्थापकांचा त्याच्यावरील विश्वास वाढला असेल; परंतु माझ्या मते या क्रमांकासाठी भारताने दुसऱ्या अनुभवी खेळाडूचा विचार करणे गरजेचे आहे. कारण पंत खेळत असताना रोहित शर्मावर दडपण आलेले दिसले. कुलदीप यादवच्या जागी रवींद्र जडेजाला खेळवले असते तर कदाचित भारताची धावसंख्या वाढली असती आणि गोलंदाजीसाठी अजून एक पर्याय मिळाला असता.

भारताने हा सामना जरी गमावला असला तरी खेळ ते त्यांच्या जिद्दीने खेळत होते. रोहित, विराट कोहली, हार्दिक पंडय़ा, महेंद्रसिंह धोनी या चार फलंदाजांनी चांगली कामगिरी केली; पण जर चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची त्यांना साथ मिळाली असती तर कदाचित भारताला हा सामनादेखील सहज जिंकता आला असता. मधल्या फळीतील फलंदाजांची कामगिरी ही भारतीय संघासाठी पुढील सामन्यासाठी फार महत्त्वाची ठरेल. सुरुवातीला गोलंदाजीमध्ये भारताला यश मिळाले नाही, परंतु नंतर बुमरा आणि शमी यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. बुमराने शेवटच्या षटकात इंग्लंडला केवळ तीन धावा दिल्या. भारताने उर्वरित दोन सामन्यांत बांगलादेश आणि श्रीलंका या संघांकडे ते कमकुवत संघ आहेत, अशा दृष्टिकोनातून पाहू नये. याऐवजी संपूर्ण ताकदीने खेळून पुढील सामने जिंकणे गरजेचे आहे. याचप्रमाणे खेळपट्टीनुसार गोलंदाजीमध्ये संयोजन करणे गरजेचे आहे.