शकिब अल हसन आणि मुशफिकर रहिम यांची अर्धशतके; मुस्तफिजूर रेहमानची भेदक गोलंदाजी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनुभवी डावखुरा गोलंदाज मुस्तफिजूर रेहमानची भेदक गोलंदाजी तसेच शकिब अल हसन आणि मुशफिकर रहिम यांच्या जोडीने साकारलेल्या शतकी भागीदारीच्या बळावर बांगलादेशने रविवारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला २१ धावांनी पराभूत केले. दक्षिण आफ्रिकेचा हा सलग दुसरा पराभव ठरला, तर बांगलादेशने यंदाच्या विश्वचषकातील पहिल्या धक्कादायक कामगिरीची नोंद करताना आशियाई संघांच्या सुमार कामगिरीपुढे पूर्णविराम दिला.

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचे सलामीवीर तमिम इक्बाल (१६) व सौम्य सरकार (४२) यांनी ६० धावांची सलामी दिली. मात्र अँडिले फेहलुकवायो आणि ख्रिस मॉरिसने तीन षटकांच्या अंतरात या दोघांना बाद केले.

२ बाद ७५ धावांवरून शकिब आणि रहिम यांनी बांगलादेशचा डाव सावरला. दोघांनी एकेरी-दुहेरी धावांच्या बळावरच तिसऱ्या गडय़ासाठी १४२ धावांची भर घातली. ही जोडी बांगलादेशला सहज ३५० धावांचा पल्ला गाठून देणार असे वाटत होते. परंतु कारकीर्दीतील १००वा एकदिवसीय सामना खेळणाऱ्या इम्रान ताहिरने शकिबचा त्रिफळा उडवून ही जोडी फोडली. आठ चौकार व एका षटकारासह ७५ धावा करून शकिब माघारी परतला, तर फेहलुकवायोने रहिमला ७८ धावांवर बाद करून बांगलादेशच्या धावसंख्येला मर्यादेत ठेवले. अखेरच्या षटकांत रियाज महमदुल्लाने ३३ चेंडूंत ४६ धावा फटकावल्यामुळे बांगलादेशने ५० षटकांत ६ बाद ३३० धावांपर्यंत मजल मारली.

त्यानंतर, ३३१ धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेनेही दमदार सुरुवात केली. क्विंटन डी’कॉक आणि एडीन मार्कराम यांनी ४९ धावांची सलामी दिली. मात्र चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात डी’कॉक २३ धावांवर धावचीत झाला. हशिम अमलाच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या फॅफ डय़ू प्लेसिसने कर्णधाराला साजेशी खेळी केली. ५३ चेंडूंत पाच चौकार व एका षटकारासह त्याने ६२ धावा केल्या. मेहदी हसनने डय़ू प्लेसिसचा त्रिफळाचीत केले. त्यानंतर मात्र आफ्रिकेने ठराविक अंतराने बळी गमावले.

मार्कराम (४५), जेपी डय़ुमिनी (४५), व्हॅन डर डुसे (४१) यांना संघाला विजयी रेषा ओलांडून देण्यात अपयश आले. रहमानने अखेरच्या षटकांत सर्वोत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन घडवत ख्रिस मॉरिस, डय़ुमिनी यांचे महत्त्वाचे बळी मिळवले. अखेरच्या षटकात ३३ धावांची आवश्यकता असताना आफ्रिकेला फक्त ११ धावाच करता आल्या आणि बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

  • बांगलादेशची विश्वचषकात आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये साकारलेली ही सर्वाधिक धावसंख्या ठरली. २०१५मध्ये त्यांनी स्कॉटलंडविरुद्ध ४ बाद ३२२ धावा केल्या होत्या.
  • शकिब-रहिम यांनी तिसऱ्या गडय़ासाठी रचलेली १४२ धावांची भागीदारी ही विश्वचषकात कोणत्याही गडय़ासाठी बांगलादेशकडून रचण्यात आलेली सर्वोच्च भागीदारी ठरली.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश : ५० षटकांत ६ बाद ३३० (मुशफिकर रहिम ७८, शकिब अल हसन ७५; इम्रान ताहिर २/४७) विजयी वि. दक्षिण आफ्रिका : ५० षटकांत ८ बाद ३०९ (फॅफ डय़ू प्लेसिस ६२, जेपी डय़ुमिनी ४५; मुस्तफिजूर रेहमान ३/६७).

सामनावीर : शकिब अल हसन.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc cricket world cup 2019 south africa vs bangladesh live
First published on: 02-06-2019 at 18:54 IST