भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात आयसीसीच्या नवीन नियमांमुळे गोंधळ निर्माण झाला. आयसीसीने २८ ऑक्टोबरपासून लागू केलेल्या नियमांनुसार कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांप्रमाणेच टी-२० सामन्यातही डीआरएस प्रणाली लागू करण्यात आली आहे. यातील नियमानुसार जर सामना १० षटकांपेक्षा कमी खेळवण्यात आला, तर एका गोलंदाजाला प्रत्येकी दोन षटके टाकता येतात. या नियमानुसार भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात तीन गोलंदाजांना सहा षटकांचा कोटा पूर्ण करता आला असता. मात्र, या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून नॅथन कोल्टर नाइलने दोन तर जेसन बेहरेन्डॉर्फ, डॅन ख्रिस्तियन, अॅडम झम्पा आणि टाय यांनी प्रत्येकी एक षटक टाकले होते.

सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फिंच म्हणाला की, पाचव्या षटकांपर्यंत या सामन्यात डीआरएस प्रणालीचा वापर करण्यात येत आहे, याची कल्पनाच नव्हती. अशा नियमावलीचा दौऱ्याच्या मध्येच वापर करणे योग्य नाही. यामध्ये भारतीय सलामीवर शिखर धवनच्या मनातही संभ्रम असल्याचे पाहायला मिळाले. त्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंप्रमणेच आपल्याला देखील नव्या नियमाविषयी पूर्ण माहिती नसल्याचे सांगितले. पण नियमात बदल झाल्यामुळे ते मान्य करावेच लागतील, असेही त्याने स्पष्ट केले.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताने ऑस्ट्रेलियाला १८.४ षटकांत ११८ धावांत रोखले. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे भारताला ६ षटकांमध्ये ४८ धावांचं आव्हान देण्यात आलं. भारताने ते ९ गडी आणि तीन चेंडू राखून पार केले.