दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या एकदिवसीय क्रमवारीतील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत बांगलादेशचा अनुभवी क्रिकेटपटू शकिब अल हसनने अग्रस्थान मिळवले आहे. अव्वल १० खेळाडूंमध्ये भारताच्या एकाही खेळाडूला स्थान मिळवता आलेले नाही. विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आठवडय़ावर येऊन ठेपली असताना ३२ वर्षीय शकिबने ही किमया साधून सर्वाचे लक्ष वेधले आहे. आर्यलडमध्ये झालेल्या तिरंगी क्रिकेट स्पर्धेत शकिबने अप्रतिम कामगिरी केली होती. या स्पर्धेत त्याने दोन नाबाद अर्धशतकांसह एकूण १४० धावा केल्या आणि दोन बळी मिळवले. शकिबच्या खात्यावर ३५९ गुण जमा आहत. अफगाणिस्तानच्या रशीद खानची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे, तर मोहम्मद नबी (३१९ गुण) तिसऱ्या स्थानावर आहे.

अव्वल १० खेळाडूंमध्ये पाकिस्तानच्या दोन खेळाडूंचा समावेश आहे. इमाद वसिम चौथ्या आणि मोहम्मद हाफीज सातव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा मिचेल सँटनर पाचव्या आणि इंग्लंडचा ख्रिस वोक्स सहाव्या स्थानावर आहेत. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर आठव्या, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा नवव्या आणि श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज दहाव्या स्थानावर आहे. भारताचा केदार जाधव १२ व्या स्थानावर आहे.