भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेतील पहिलाच सामना सहा गडी राखून जिंकला. या सामन्यानंतर रोहित शर्माच्या नाबाद शतकाबरोबरच धोनीच्या खास ग्लोजचीही चांगलीच चर्चा झाली. मात्र धोनीने या सामन्यात वापरलेले पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटचे सन्मानचिन्ह असणारे ग्लोज वापरू नयेत असे आदेश आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) दिले आहेत. आयसीसीच्या याच आदेशावरुन पाकिस्तानी वंशाचे लेखक तारेक फतेह यांनी मैदानात पाकिस्तानी संघाचा नमाज चालतो तर धोनीने ग्लोज घातल्यास त्यात चुकीचे काय असा सवाल उपस्थित केला आहे. फतेह यांनी ट्विट करुन यासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे.

धोनीच्या ग्लोज प्रकरणासंदर्भात फतेह यांनी दोन ट्विट केले आहेत. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘आयसीसीने भारतीय संघाचा यष्टीरक्षक लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनीला त्याच्या ग्लोजवरुन लष्कराचे सन्मानचिन्ह काढण्यास सांगितले आहे. धोनीने हे ग्लोज वापरले पाहिजेत. या प्रकरणामध्ये बीसीसीआयने धोनीच्या पाठिशी उभं रहायला हवे. विश्वचषकामध्ये इस्लामिक पद्धतीनुसार दाढी मिशा चालतात. धोनीच्या ग्लोजची कोणालाही अडचण नसावी.’

आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये फतेह यांनी पाकिस्तानी संघाचा एक जुना फोटो ट्विट केला आहे. यामध्ये संपूर्ण पाकिस्तानी संघ क्रिकेटच्या मैदानातच नमाज पठण करताना दिसत आहे. हा फोटो ट्विट करताना फतेह म्हणतात, ‘आयसीसीला पाकिस्तानी संघ मैदानात प्रार्थना (नमाज पठण) करतो याबद्दल काहीच आक्षेप नाही. या प्रार्थनेमध्ये ख्रिस्ती आणि ज्यू लोकांना कमी लेखले जाते. आयसीसीला फक्त धोनीने घातलेल्या ग्लोजवरील बलिदान चिन्हाचं वावडं आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फतेह यांच्याबरोबर अनेक नेटकऱ्यांनी या प्रकरणात धोनीच पाठराखण केली आहे. ‘बलिदान’ असा संदेश देणारे चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज धोनीने पुढील सामन्यातही वापरावेत अशी गळ नेटकऱ्यांनी धोनीला घातली आहे. ट्विटरवर #DhoniKeepTheGlove हा हॅशटॅग टॉप ट्रेण्डींग असून हा हॅशटॅग वापरून अनेकांनी धोनीच्या या कृतीचे समर्थन केले आहे. धोनीने आपल्या देशाच्या सैन्याप्रती दाखवलेले हे प्रेम असून त्यात काहीच चूक नसल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.