दुबई : भारताच्या दीप्ती शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ट्वेन्टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले. तर, सलामी फलंदाज स्मृती मनधानाची फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

दीप्ती पाकिस्तानच्या सादिया इकबालसह (७३२ गुण) संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची ॲनाबेल सदरलँड चार गुणांच्या कमाईसह प्रथमच ट्वेन्टी-२० क्रमवारीत अग्रस्थानी पोहोचली आहे. सादियाने आयर्लंडविरुद्ध मालिकेत केवळ तीन फलंदाज बाद केल्याने आपले स्थान गमावले. पाकिस्तान महिला संघाने ही मालिका १-२ अशी गमावली. सदरलँडने मार्चमध्ये न्यूझीलंडविरुद्ध चार गडी बाद केल्यानंतर एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे तिच्या गुणांमध्ये फरक झाला नाही.

ट्वेन्टी-२० अष्टपैलूंच्या क्रमवारीत दीप्ती ३८७ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. तर, वेस्ट इंडिजची हेली मॅथ्यूज (५०५ गुण) व न्यूझीलंडची अमेलिया कर (४३४ गुण) तिच्या पुढे आहेत. मनधाना (७२८ गुण) एका स्थानाच्या घसरणीसह इंग्लंडच्या नॅट स्किव्हर-ब्रंटनंतर (७३१ गुण) दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे.

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर दहा स्थानांच्या फायद्यासह शीर्ष दहा फलंदाजांमध्ये येण्याच्या जवळ पोहोचली आहे. ती सध्या ११व्या स्थानी आहे. आयर्लंडची अष्टपैलू ओर्ला प्रेंडरगॅस्टला पाकिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे बक्षीस मिळाले. ती कारकीर्दीतील सर्वोत्तम १९व्या स्थानी पोहोचली आहे.