३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. या स्पर्धेसाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा बीसीसीआयच्या निवड समितीने याआधीच केली आहे. ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या हार्दिक पांड्यालाही भारतीय संघात जागा मिळालेली आहे. विराट कोहलीचा भारतीय संघ विश्वचषक विजयाचा प्रबळ दावेदार मानला जातोय. हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये चांगलाच फॉर्मात आहे. मात्र विश्वचषकासाठी त्याच्यावर दबाव टाकणं योग्य ठरणार नाही असं मत, माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केलं आहे.

हार्दिक पांड्याकडून असलेल्या अपेक्षा आणि त्याच्या कामगिरीबद्दल प्रश्न विचारला असता कपिल देव म्हणाले, “हार्दिकवर दबाव टाकणं योग्य ठरणार नाही. तो तरुण खेळाडू आहे आणि त्याला त्याच्या नैसर्गिक शैलीनुसार खेळू द्यायला हवं. त्याची कोणासोबतही तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही. तो एक चांगला गोलंदाज आहे आणि इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या त्याच्यासाठी फायदेशीर ठरतील.” याचसोबत बुमराह आणि शमी यांची भूमिकाही महत्वाची असेल असं कपिल देव म्हणाले.

अवश्य वाचा – भारतीय संघ विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत पोहचेल – कपिल देव

दरम्यान, भारतीय संघ विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत नक्की मजल मारेल यात काहीच शंका नाही. मात्र त्यानंतर कोणता संघ विजेता ठरेल हे सांगणं कठीण असल्याचं कपिल देव म्हणाले. भारताव्यतिरीक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघही उपांत्य फेरीपर्यंत पोहचू शकतील असा अंदाज देव यांनी व्यक्त केला. याव्यतिरीक्त न्यूझीलंड आणि विंडीजचा संघ या स्पर्धेत सरप्राईज फॅक्टर ठरू शकतो असंही कपिल देव म्हणाले.