अॅशेस मालिकेतील मानहानीकारक पराभवानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत इंग्लंडची सुरूवात पराभवानेच झाली आहे. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला धूळ चारत विजय प्राप्त केला.
ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंड संघावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात सहा विकेट्सने मात करत मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱया इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर २६९ धावांचे समाधानकारक आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाकडून अॅरॉन फिंचने १२१ धावांची तडफदार खेळी साकारली त्याला डेव्हिड वॉनर्रने ६५ धावा करत उत्तम साथ दिली. शतकी कामगिरी करणाऱया फिंचला सामनाविराचा किताब देण्यात आला.
नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱया इंग्लंडने सुरुवातच निराशाजनक केली. सलामीवीर फलंदाज स्वस्तात तंबूत परतले होते. त्यानंतर बॅलेन्स (७९) आणि मॉर्गन (५०) यांच्या सावध खेळीने इंग्लंडला २६९ पर्यंत मजल मारता आली.