सूर्यकुमार यादवने झळकावलेल्या विस्फोटक अर्धशतकाच्या बळावर टीम इंडियाने चौथ्या टी२० सामन्यात इंग्लंडला आठ धावांनी धुळ चारली. या विजयासोबतच भारताने पाच सामन्यांच्या मालिकेतही २-२ अशी बरोबरी साधली. सहा चौकार आणि तीन षटकरांची बरसात करत सूर्यकुमारने ३१ चेंडूत ५७ धावा ठोकल्या. कारकिर्दीतील पहिलाच चेंडू त्याला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने टाकला आणि त्यावर उत्तुंग षटकार खेचत सूर्यकुमारने आपल्यातील प्रतिभा दाखवून दिली. त्याच्या या खेळीचं क्रिकेटविश्वातून कौतुक होत आहे. भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू ‘सिक्सर किंग’ युवराज सिंह हा देखील सूर्यकुमारच्या फलंदाजीवर फिदा झालाय.

आणखी वाचा- IND vs ENG : रोहित शर्माने १० वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी सूर्यकुमार यादवने खरी ठरवली!

सूर्यकुमार यादवने दमदार अर्धशतक ठोकल्यानंतर युवराजने ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया दिली. “सूर्यकुमारसाठी खरंच आनंदी आहे… तो आयपीएलमधील सामन्यात खेळतो तशाप्रकारेच फलंदाजी करत आहे. माझ्या वर्ल्ड कपच्या संघात याचं स्थान नक्की झालंय…”, अशा शब्दात युवराजने सूर्यकुमारला कौतुकाची थाप दिली. तसेच आगामी वर्ल्ड कप टी-२०मध्ये टीम इंडियात सूर्यकुमारला स्थान मिळायला हवं यावरही बोट ठेवलं.

आणखी वाचा- IND vs ENG: इंग्लंडविरोधातील विजयाचा शिल्पकार सूर्यकुमारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

आणखी वाचा- मोठी बातमी..! इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

दरम्यान, आपल्या पदार्पणाच्या इनिंगमध्येच अर्धशतक झळकावणारा सूर्यकुमार पाचवा भारतीय फलंदाज ठरलाय. सूर्यकुमारच्याआधी रोहित शर्मा, रॉबिन उथप्पा, अजिंक्य रहाणे आणि इशान किशन यांनी ही कामगिरी केली आहे. तसं बघायला गेलं तर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमारचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं. पण त्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही, तिसऱ्या सामन्यात त्याला संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यानंतर काल झालेल्या चौथ्या सामन्यात सूर्यकुमारला पहिल्यांदाच फलंदाजीची संधी मिळाली आणि संधीचं सोनं करत त्याने दमदार अर्धशतक झळकावलं. शानदार खेळीसाठी सूर्यकुमारला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आलं. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील अखेरचा टी२० सामना शनिवारी अहमदाबादमध्येच होणार आहे.