क्रिकेटचे सामने आणि प्रेक्षक हे एक यशस्वी समीकरण मानलं जातं. क्रिकेटच्या सामन्याला जितकी प्रेक्षकांची हजेरी जास्त, तितका सामना महत्त्वाचा असतो. पण करोनाच्या काळात क्रिकेट आणि प्रेक्षक यांची ताटातूट झाली. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात विनाप्रेक्षक सामना खेळवण्यात आला. त्यानंतर जवळपास ४ ते ५ महिने क्रिकेट बंद होतं. ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू झालं. त्यानंतर सप्टेंबरमध्ये भारताबाहेर का होईना पण भारतीय क्रिकेटचा उत्सव, IPLची सुरूवात झाली. सध्या होणारे सारे सामने हे विनाप्रेक्षक खेळवले जात आहेत. पण लवकरच टीम इंडियाच्या एका सामन्याला प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २७ नोव्हेंबर ते १९ जानेवारी या कालावधीत क्रिकेट मालिका होणार आहे. यातील कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरूवात होणार असून मेलबर्नच्या मैदानावर बॉक्सिंग डे टेस्ट खेळवली जाणार आहे. नाताळच्या दुसऱ्या दिवशी (२६ डिसेंबर) खेळल्या जाणाऱ्या सामन्याला बॉक्सिंग डे सामना म्हणतात. या कसोटी सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार असल्याची चर्चा आहे. मेलबर्नच्या स्टेडियममधील आसनक्षमतेच्या २५ टक्के म्हणजेच अंदाजे २५ हजार लोकांना सामन्यासाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्याचा विचार ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड करत आहे.

स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश मिळावा यासाठी व्हिक्टोरिया सरकार, मेलबर्न क्रिकेट क्लब आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकत्रितपणे काम करत असून कोविडपासून सुरक्षा करण्याबाबतची नवी नियमावली (COVIDSafe plan) तयार केली जात आहे. “COVIDSafe plan अंतर्गत आम्ही व्हिक्टोरिया सरकार आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांशी बॉक्सिंग डे कसोटीबाबत चर्चा करत आहोत”, असे मेलबर्न क्रिकेट क्लबचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट फॉक्स यांनी सांगितले.

याच मुद्द्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख अर्ल एडिंग्स यांनीही माहिती दिली. “बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका ही कायमच मानाची समजली जाते. जस्टीन लँगरच्या मार्गदर्शनाखालील आणि टीम पेनच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ एका प्रतिभावंत भारतीय संघाविरोधात खेळताना पाहायला साऱ्यांनाच आवडेल. बॉक्सिंग डे टेस्टबद्दल बोलायचं तर, २९१ दिवसांपूर्वी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात व्हिक्टोरियावासीयांनी मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर स्टेडियममध्ये बसून क्रिकेटचा आनंद लुटला. त्यामुळे आता व्हिक्टोरियावासीयांना आणखी काळ वाट बघायला लावणं बरोबर नाही”, असे एडिंग्स यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus good news team india vs australia boxing day test mcg to allow maximum 25k spectators virat kohli rohit sharma vjb
First published on: 28-10-2020 at 16:45 IST