बॉर्डर गावसकर मालिकेतील ब्रिस्बेन येथे सुरु असलेला अखेरचा कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचे हिरो ठरले शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर. भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद ३३६ धावांपर्यंत मजल मारली. डावाच्या सुरूवातीला फलंदाजी डगमगली असली तरी तळाच्या दोन फलंदाजांनी दमदार खेळ करत यजमानांना केवळ ३३ धावांचीच आघाडी मिळू दिली. शुबमन गिल (७), रोहित शर्मा (४४), चेतेश्वर पुजारा (२५), अजिंक्य रहाणे (३७), मयंक अग्रवाल (३८) आणि ऋषभ पंत (२३) हे भरवशाचे फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि आणि शार्दुल ठाकूर या दोघांनी १२३ धावांची भागीदारी रचली. या दमदार संघर्षामुळे शार्दूल आणि वॉशिंग्टन सुंदरवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. असं असतानाच वॉशिंग्टनच्या नावासंदर्भात चर्चा पुन्हा नव्याने सुरु झालीय. आपल्या फलंदाजीने कोट्यावधी चाहत्यांवर छाप पाडण्याची किमया वॉशिंग्टनने साधली मात्र त्याच्या नावाबद्दलचे कुतूह आजही अनेकांना आहे. त्याचे नावं वॉशिग्टन का ठेवण्यात आले याबद्दलचा किस्सा त्याच्या वडिलांनीच काही वर्षांपूर्वी ‘द हिंदू’ या वृत्तपत्राला दिलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये सांगितला होता.

आणखी वाचा- ‘सुंदर’ खेळीनं त्यानं कोट्यावधी चाहत्यांची मन जिंकली मात्र वडील म्हणतात…

भारतीय असूनही इंग्रजी व्यक्तीप्रमाणे मुलाला दिलेल्या नावाबद्दल सुंदर म्हणाले की, मी हिंदू असून, आमचे कुटुंब अगदी साधे आहे. ट्रिप्लिकेनमध्ये (आत्ताचे थिरुवल्लीकेनी) आमच्या घरापासून दोन गल्ल्या सोडून सैन्यातून निवृत्त झालेले पी. डी. वॉशिंग्टन नावाचे एक गृहस्थ राहत होते. ते क्रिकेटचे मोठे चाहते होते. आम्ही क्रिकेट खेळायला जायचो तेव्हा ते मरिना मैदानावर आमचा खेळ पाहण्यासाठी यायचे. ते स्वत: एक उत्तम क्रिकेटपटू होते. आमच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. म्हणून माझ्या खेळाच्या प्रेमात पडलेल्या या गृहस्थांनी मला शाळेचा गणवेश घेऊन दिला, माझ्या शाळेची फी भरली तसेच पुस्तके दिल्याच्या आठवणी सुंदर यांनी या मुलाखतीमध्ये सांगितल्या. केवळ आर्थिक मदत नाही तर वॉशिंग्टन हे मला सायकलीवरुन मैदानावर घेऊन जायचे. तसेच सतत मला प्रेरणा देत राहायचे असेही सुंदर यांनी सांगितले.

एक नंबर! असा षटकार तुम्ही कधी पाहिलात का?; पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुंदर यांनी रणजी संघात स्थान मिळवल्यानंतर वॉशिंग्टन खूप खूश झाले होते. त्यांना आपल्यामुळे आंनद झाल्याचे पाहून मला बरे वाटायचे. कारण त्यांनी माझ्यासाठी बरेच कष्ट घेतलेले आणि त्यामुळेच ते माझ्यासाठी खूप काही होते. मात्र दुर्देवाने माझ्या पहिल्या मुलाच्या जन्मापूर्वीच त्यांचे निधन झाले. माझ्या पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळी अनेक वैद्यकीय अडचणी आल्या. मात्र माझा मुलगा वाचला. आमच्याकडील प्रथेप्रमाणे त्याच्या नामकरणाच्या वेळी मी बाळाच्या कानात श्रीनिवास हे नाव बोललो आणि त्याचे नाव श्रीनिवास ठेवले. मात्र मी आधीपासून ठरवलेले त्याप्रमाणे माझ्या पहिल्या मुलाला मी वॉशिंग्टन यांचे नाव दिले. माझ्यासाठी इतकं काही करणारी व्यक्ती कायम लक्षात राहावी म्हणून मी माझ्या मुलाचे नाव वॉशिंग्टन ठेवले. मला दुसरा मुलगा झाला असता तर मी त्यालाही वॉशिंग्टन ज्युनियर नावानेच हाक मारली असती असंही, वॉशिग्टन सुंदरचे वडील या मुलाखतीच्या शेवटी म्हणाले. वॉशिग्टन सुंदरचा जन्म ५ ऑक्टोबर १९९९ चा आहे.