भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातली कसोटी मालिका सध्या रंगतदार अवस्थेत पोहचली आहे. पर्थ कसोटीत विराट कोहली आणि टीम पेन यांच्यात झालेल्या वादानंतर कोहलीवर अनेक माजी खेळाडूंनी टीका केली. याचसोबत अनेक खेळाडूंनी विराटच्या मागणीचं समर्थनही केलं. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॅड हॉगनेही कोहलीच्या वागण्याचं समर्थन केलं आहे. विराट हा भारतीय संघाचा उर्जास्त्रोत असल्याचं, हॉगने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

“विराट हा भारतीय संघाचा उर्जास्त्रोत आहे. संघातल्या अनेक खेळाडूंसाठी तो आदर्श आहे. ज्यावेळी विराट मैदानात येतो त्याच्यातला उत्साह पाहण्यासारखा असतो, साहजिकपणे विराटही आपल्या संघाकडून अशाच प्रकारचा उत्साह आणि उर्जेची अपेक्षा करतो. त्यामुळे सध्याच्या घडीला विराट एका आदर्श कर्णधाराप्रमाणे संघाची कमान सांभाळत असून त्याच्या साथीदारांना आपल्या सोबत घेऊन चालत आहे.” हॉगने विराट कोहलीच्या नेतृत्वगुणांचं कौतुक केलं.

फलंदाजीमध्येही कोहली सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. सध्याच्या घडीला कोणताही फलंदाज कोहलीच्या जवळ जाऊ शकणार नाही. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा काहीकाळ कोहलीला चांगली टक्कर देतो, मात्र कोहलीवर मात करेल असा एकही फलंदाज ऑस्ट्रेलियाकडे नाहीये. योग्य वेळी धावा घेऊन स्कोअरबोर्ड हलता ठेवणं, चौकार-षटकारांमधली नजाकत या सर्व गोष्टी पाहिल्या की विराट कर्णधारासोबत सर्वोत्तम फलंदाज असल्याचंही सिद्ध होतं. हॉगने विराट कोहलीच्या खेळावर आपलं मत मांडलं. या दोन्ही संघांमधला तिसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर सुरु होणार आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : विराटच्या नेतृत्वाखाली भारत जशास तसं उत्तर द्यायला शिकलाय – सर व्हिविअन रिचर्ड्स