भारत विरूध्द इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत हिटमॅनची बॅट तळपली. हिटमॅनसोबतच भारताचा तुफानी फलंदाजी करणारा शुबमन गिलने भन्नाट फॉर्मसह आपले चौथे कसोटी शतक झळकावले आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा ३ षटकार आणि १३ चौकारांच्या मदतीने १५५ चेंडूंत १०१ धावा केल्या. तर शुबमन गिलने १४१ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले, त्याने ५ षटकार आणि १० चौकार लगावले आहेत.
रोहितने शुबमन गिलसोबत २०० अधिक धावांची भागीदारी रचत भारताची धावसंख्या २०० पार नेऊन ठेवली. यासोबतच भारताने इंग्लंडने दिलेले २१८ धावांचे लक्ष्य गाठत ४४ धावांची आघाडीही मिळवली आहे.रोहितने या शतकासह कसोटीमधील १२ वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील ४७ वे शतक झळकावले आहे. तर शुबमन गिलने कसोटीमधील चौथे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील १०वे शतक केले.
रोहित शर्माने या कसोटीत शतकापूर्वी षटकारांचा एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. हिटमॅनने एक असा विक्रम आपल्या नावे केला आहे, जो कोणत्याही भारतीय खेळाडूला करता आलेला नाही. रोहितने ३२ सामन्यांच्या ५४ डावांमध्ये ५० षटकार लगावले आहेत. जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या इतिहासात ५० षटकार मारणारा रोहित शर्मा हा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. तर पहिल्या क्रमांकावर इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्स आहे, ज्याच्या नाव ७८ षटकार आहेत.
पाचव्या कसोटीच्या पहिव्या डावात गोलंदाजीने वर्चस्व गाजवल्यानंतर भारताची फलंदाजीची सुरूवातही शानदार झाली. यशस्वी आणि रोहितच्या जोडीने विस्फोटक फलंदाजी करत इंग्लिश संघाला बॅकफूटवर ठेवले. जैस्वालने बाद होण्यापूर्वी ५८ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पा गाठला.
पाचव्या कसोटीत इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बेन स्टोक्सचा हा निर्णय संघाच्या पथ्यावर पडला कारण संघाची सुरूवात चांगली झाली. पण सलामीवीर बाद झाल्यानंतर मात्र मधल्या फळीतील फलंदाज पुन्हा एकदा फेल ठरले. १३५ वर ४ बाद अशी धावसंख्या असताना कुलदीप आणि अश्विनच्या फिरकीवर २१८ धावा होईपर्यंत इंग्लिश संघ ऑल आऊट झाला. कुलदीपने १५ षटकांत ५ विकेट्स घेत आपल्या फिरकीच्या तालावर इंग्लंड संघाला नाचवले. नंतर आपला १०० वा कसोटी सामना खेळत असलेल्या अश्विनने ४ विकेट्स मिळवले. तर जडेजाला १ विकेट मिळवण्यात यश आले.