Ravindra Jadeja nears 300 Test wickets : टीम इंडियाचा अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात मोठा विक्रम करू शकतो. ३५ वर्षीय अष्टपैलू रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये अनोखे त्रिशतक झळकावण्याच्या जवळ आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना ७ मार्चपासून धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

सध्याच्या कसोटी मालिकेत भारताने इंग्लंडविरुद्ध ३-१ अशी अभेद्य आघाडी कायम ठेवली आहे. भारताने याआधीच कसोटी मालिका जिंकली आहे. या मालिकेत रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये मोठे यश मिळविण्याच्या अगदी जवळ आहे. रवींद्र जडेजाने आतापर्यंत भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये ७१ कसोटी सामन्यांमध्ये २९२ विकेट घेतल्या आहेत. धरमशाला येथे इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात रवींद्र जडेजाने ८ विकेट्स घेतल्यास तो इतिहास घडवेल. रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स पूर्ण करणार आहे. रवींद्र जडेजाने सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील ३ सामन्यांत १७ विकेट्स घेतल्या आहेत.

रवींद्र जडेजा ३०० कसोटी विकेट्स पूर्ण करणार –

रवींद्र जडेजाच्या सध्या कसोटी कारकिर्दीत २९२ विकेट्स आहेत. जर त्याने दोन्ही डावात ८ विकेट्स घेतल्या, तर त्याच्या कसोटी फॉरमॅटमध्ये ३०० विकेट्स होतील. त्यामुळे ३०० विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज ठरणार आहे. श्रीलंकेचा रंगना हेराथ आणि न्यूझीलंडचा डॅनियल व्हिटोरी यांच्यानंतर एकूणच हा टप्पा गाठणारा तो तिसरा डावखुरा फिरकी गोलंदाज ठरेल. खरं तर, जडेजाला इंग्लंडच्या डेरेक अंडरवूडला मागे टाकण्यासाठी आणि डावखुरा फिरकीपटूसाठी इतिहासातील तिसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरण्यासाठी आणखी पाच विकेट्सची गरज आहे.

हेही वाचा – प्री वेडिंगसाठी कायपण; कायरन पोलार्ड लीग सोडून पाकिस्तानातून भारतात

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे डावखुरे फिरकीपटू –

रंगना हेरथ (श्रीलंका)- ४३३ विकेट्स
डॅनियल व्हिटोरी (न्यूझीलंड)- ३६२ विकेट्स
डेरेक अंडरवूड (इंग्लंड)- २९७ विकेट्स
रवींद्र जडेजा (भारत)- २९२ विकेट्स
बिशनसिंग बेदी (भारत)- २६६ विकेट्स

जडेजाला कपिल देवचा विक्रम मोडण्याची संधी –

खरं तर रवींद्र जडेजाने कसोटी सामन्यात ९ विकेट घेतल्यास तो कपिल देवला मागे टाकून भारतीय भूमीवर चौथा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल. त्याच्याकडे सध्या भारतात २११ विकेट्स आहेत आणि आणखी ९ विकेट्स घेतल्यास तो कपिल देवला मागे टाकेल. कपिल देवने २१९ विकेट्स घेतल्या आहेत. याआधी कसोटी मालिकेत भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने अनिल कुंबळेला मागे टाकून ३५४ विकेट्स घेऊन भारतीय भूमीवर सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.

हेही वाचा – Elections : युवराज सिंग भाजपच्या तिकिटावर गुरुदासपूरमधून निवडणूक लढवणार का? ‘सिक्सर किंग’ने दिले उत्तर

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज –

१. अनिल कुंबळे – ६१९ विकेट्स
२. रविचंद्रन अश्विन – ५०७ विकेट्स
३. कपिल देव – ४३४ विकेट्स
४. हरभजन सिंग – ४१७ विकेट्स
५. इशांत शर्मा/झहीर खान – ३११ विकेट्स
६. रवींद्र जडेजा – २९२ विकेट्स