आयसीसी अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज राज बावाने घातक गोलंदाजी करत इंग्लंडच्या टॉप ऑर्डरला उद्ध्वस्त केले. या विश्वचषकात बावा एक महान अष्टपैलू खेळाडू म्हणून उदयास आला आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत चार डावात ७२.३३ च्या सरासरीने २१७ धावा केल्या आहेत.
गोलंदाजीत बावाला पहिल्या काही सामन्यांमध्ये जास्त विकेट घेता आल्या नाहीत, पण अंतिम सामन्यात तो मोठा खेळाडू ठरला. त्याने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यात लागोपाठ दोन चेंडूंत दोन बळींचाही समावेश होता. त्याने या स्पर्धेतील सहा सामन्यांत नऊ विकेट्स घेतल्या आहेत. अंडर-१९ विश्वचषकाच्या फायनलमध्ये पाच विकेट घेणारा राज बावा हा भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. ३१ धावांत पाच विकेट्स ही त्याची गोलंदाजी अंतिम फेरीतील सर्वोत्तम गोलंदाजी आहे. बावांनाही चांगला वेग आहे. अशा परिस्थितीत तो भविष्यात भारताचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडूसाठी पर्याय ठरू शकतो.
हेही वाचा – VIDEO : अंडर १९ वर्ल्डकप फायनलमध्ये महाराष्ट्राच्या कौशल तांबेनं घेतलेला ‘कडक’ कॅच पाहिला का?
राज बावा हा डावखुरा फलंदाज आहे. टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळआडू युवराज सिंगला बावा आदर्श मानतो. युवराजप्रमाणेच तो १२ क्रमांकाची जर्सी घालतो. या नवोदित अष्टपैलू खेळाडूच्या वडिलांच्या देखरेखीखाली युवराज सिंगने प्रशिक्षण घेतले आहे. राजला क्रिकेटशिवाय नृत्य आणि नाटकाची आवड आहे.
राज बावाला खेळाचा वारसा लाभला आहे. राजचे आजोबा तरलोचन सिंग बावा हे १९४८च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य होते. त्याचवेळी राजचे वडील सुखविंदर सिंग बावा हे क्रिकेट प्रशिक्षक राहिले आहेत. राजने युवराजला त्याच्या वडिलांच्या क्लबमध्ये फलंदाजी करताना पाहिले आहे आणि त्याला युवराज सिंगसारखे बनण्याची इच्छा आहे.