न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना आज हैदराबाद येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. यासामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने षटकार लगावताच एक विक्रम केला आहे. त्याचबरोबर त्याने या षटकाराच्या मदतीने धोनीचा एक विक्रमदेखील मोडला.
कर्णधार रोहित शर्माने आजच्या सामन्यात ३८ चेंडूत ३४ धावा केल्या. या दरम्यान त्याने आपल्या खेळीत २ षटकार आणि ४ चौकार लगावले. रोहितने २ षटकार भारतात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो भारताचा नवा ‘सिक्सर किंग’ बनला आहे. त्याने या विक्रमात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे.
फलंदाज रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार कव्हरच्या वरुन उत्तुंग षटकार लगावला. हा षटकार लगावताच त्याने एमएस धोनीला मागे सोडले. धोनीने भारतातील वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२३ षटकार मारले होते, परंतु रोहित शर्माने त्याच्या षटकारांची संख्या १२४ वर नेली. त्याने पाचव्या षटकात आणखी एक षटकार मारला.
या यादीत सचिन तेंडुलकरचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे, पण भारतीय भूमीवर वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने १०० षटकार मारलेले नाहीत. भारतातील वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७१ षटकार मारण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. त्याचबरोबर रोहित हा वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ५०० षटकार मारणारा तो एकमेव आशियाई खेळाडू आहे. ख्रिस गेल सध्या त्याच्या पुढे आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ५५३ षटकार लगावले आहेत. रोहितने आतापर्यंत ५१० षटकार लगावले आहेत.
