न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या विराट कोहलीच्या भारतीय संघ सध्या चांगलाच अडचणीत आलेला आहे. टी-२० मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाला वन-डे मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर वेलिंग्टन कसोटी सामन्यातही न्यूझीलंडने १० गडी राखत भारतावर मात केली. मयांक-अजिंक्य वगळता इतर फलंदाजांचं अपयश आणि इशांत शर्माची एकाकी झुंज या भारतीय संघासाठी आश्वासक गोष्टी ठरल्या.

इशांत शर्माने या सामन्यात पहिल्या डावात न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद केला. त्याच्या या कामगिरीचं माजी ऑस्ट्रेलियन गोलंदाज ग्लेन मॅकग्राने कौतुक केलं आहे. “इशांत अनुभवी गोलंदाज आहे, गेल्या काही वर्षांमध्ये त्याने ज्या पद्धतीने पुनरागमन केलंय हे कौतुकास्पद आहे. माझ्या मते काही वर्षांपूर्वी त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द धोक्यात होती, पण यानंतरही त्याने स्वतःच्या गोलंदाजीत केलेले बदल हे वाखणण्याजोगे होते”, एका कार्यक्रमात मॅकग्रा पत्रकारांशी बोलत होता.

अवश्य वाचा – ICC Test Ranking : विराटने अव्वल स्थान गमावलं; मराठमोळ्या अजिंक्यला बढती

यावेळी मॅकग्राने भारतीय गोलंदाजांचीही पाठराखण केली. “मी भारतीय गोलंदाजीबद्दल अजुनही आश्वासक आहे. गेल्या काही दिवसांत भारतीय संघाला दुखापतीने ग्रासलं आहे. इशांत-बुमराह चांगल्या पद्धतीने पुनरागमन करतायत. त्यामुळे या भारतीय गोलंदाजांमध्ये अजुनही तितकीच ताकद आहे यात काही शंका नाही.” कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आपलं अव्वल स्थान कायम राखण्यासाठी दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला विजय मिळवणं गरजेचं आहे. २९ फेब्रुवारीपासून ख्राईस्टचर्चच्या मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.