वन-डे मालिकेत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघासमोर आता कसोटी मालिकेचं आव्हान असणार आहे. २१ फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. मात्र रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघासमोर सलामीला फलंदाजीसाठी कोण येणार हा मोठा प्रश्न आहे. सध्या या जागेसाठी शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ यांच्यात चुरस आहे. मात्र या मालिकेसाठी आता मधल्या फळीतला फलंदाज हनुमा विहारीनेही सलामीच्या जागेवर फलंदाजीला येण्याची तयारी दाखवली आहे.

“एक खेळाडू म्हणून मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार आहे. आतापर्यंत मला कोणतीही गोष्ट सांगण्यात आलेली नाहीये. पण संघाला माझी ज्या जागेवर गरज असेल तिकडे मी फलंदाजीसाठी तयार आहे.” न्यूझीलंडविरुद्ध सराव सामन्यात शतक झळकावल्यानंतर हनुमा विहारी पत्रकारांशी बोलत होता. मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या हनुमा विहारीने आतापर्यंत मिळालेल्या संधीचं सोनं केलेलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध सराव सामन्यात त्याने १०१ धावांची खेळी केली.

अवश्य वाचा – कसोटी अजिंक्यपद जिंकणं हे वन-डे, टी-२० विश्वचषक जिंकण्यापेक्षा मोठं – चेतेश्वर पुजारा

काही वेळा तुम्हाला संघाच्या बांधणीचाही विचार करावा लागतो. तुम्हाला निराश होऊन चालत नाही. घरच्या मैदानावर खेळताना आम्ही ५ गोलंदाजांनिशी खेळतो, अशावेळी एका खेळाडूला बाहेर बसावं लागतं. मला आतापर्यंत कोणालाही कोणतीही गोष्ट सिद्ध करुन दाखवावीशी वाटली नाही, हनुमा आपल्या फलंदाजीबद्दल बोलत होता. न्यूझीलंडविरुद्ध सराव सामन्यात हनुमा विहारीने पुजारासोबत महत्वपूर्ण शतकी भागीदारी केली.

अवश्य वाचा – टीम इंडियाची ताकद वाढली, इशांत शर्मा फिटनेस टेस्ट पास