IND vs PAK Pakistan Bowlers Disrespect India’s Anthem: भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकातील अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर पाकिस्तान संघाने फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता ५६ धावा करत चांगली सुरूवात केली. पण सामन्यापूर्वी राष्ट्रगीतादरम्यान पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारताच्या राष्ट्रगीताचा अपमान केला.
भारत-पाकिस्तान आशिया चषक फायनलच्या नाणेफेकीदरम्यान वेगळंच दृश्य दिसलं. भारतीय संघाच्या कर्णधाराची मुलाखत घ्यायला रवी शास्त्री होते. तर पाकिस्तानच्या कर्णधाराची मुलाखत घ्यायला वकार युनूस नाणेफेकीसाठी आले होते. या घटनेने सर्वांचं लक्ष वेधलं.
नाणेफेकीनंतर सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानावर उतरतात. यादरम्यान पाकिस्तान संघाचं राष्ट्रगीत आधी झालं. यानंतर भारताचं राष्ट्रगीत घेण्यात आलं. पाकिस्तानचं राष्ट्रगीत झाल्यानंतर पाकिस्तानच्या हारिस रौफ आणि शाहीन आफ्रिदी यांनी भारताच्या राष्ट्रगीताचा अपमान केला. भारताचं राष्ट्रगीत सुरू असताना शाहीन आफ्रिदी एक पाय पुढे ठेवून ऐटीत उभा होता, तर हातांबरोबर काहीतरी करत बाजूच्याशी गप्पा मारत होता. तर हारिस रौफ कंबरेवर हात ठेवून जणू काही कधी एकदा संपतंय या आवेषात उभा होता.
सूर्यकुमार यादव अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराबरोबर ट्रॉफीसह फोटोशूटसाठी गेला नाही. याचीदेखील मोठी चर्चा होती. पाकिस्तानच्या कर्णधाराने एकट्याने ट्रॉफीसह फोटोशूट केल्याचा फोटो व्हायरल होत आहे. पाकिस्तानने यानंतर सामन्यात सुरूवातीला कमालीची फलंदाजी केली. पाकिस्तानच्या सलामी जोडीने ८४ धावांची भागीदारी केली. तर पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानने अर्धशतक करत चांगली सुरूवात करून दिली आहे.