Ind vs Pak: विश्वचषकामधील आकडेवारी काय सांगते पाहा?; भारताने नक्की कितीवेळा शेजाऱ्यांना केलंय पराभूत?

४६ वर्षांच्या इतिहासात, वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा भारताकडून पराभव झाला आहे

Ind vs pak world cup history t20 world cup 24th October
(फोटो सौजन्य- ट्विटर/Youtube)

टी -२० विश्वचषक पात्रता फेरी सुरू झाली आहे आणि सुपर १२ चा मुख्य टप्पा २३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यात भारत आणि पाकिस्तानची हाय-व्होल्टेज मॅच २४ ऑक्टोबर रोजी म्हणजेच येत्या रविवारी होणार आहे. या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान समोरासमोर असतील. यापूर्वी, दोन्ही संघ विश्वचषकाच्या इतिहासात १२ वेळा आमनेसामने आले आहेत.

मात्र प्रत्येक वेळी भारताने पाकिस्तानला हरवले आहे. पहिला वर्ल्ड कप १९७५ मध्ये एकदिवसीय प्रकारामध्ये खेळवला गेला होता. भारत आणि पाकिस्तान १९९२ मध्ये विश्वचषकात पहिल्यांदाच समोरासमोर आले होते. या विश्वचषकामध्ये पाकिस्तान विजेता होता पण इथेही त्याला भारताकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.

१९९२ पासून सुरू झालेला पाकिस्तानच्या पराभवाचा प्रवास हा २०१९ पर्यंत पोहचला आहे. १२ वेळा पाकिस्तान भारताकडून पराभूत झाला आहे. या १२ पैकी ५ पराभवांचा समावेश टी -२० वर्ल्डकपमध्ये आहे. म्हणजेच ७ वेळा भारताने एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानचा पराभव केला आहे.

यावेळी दोन्ही संघ टी -२० विश्वचषकात सहाव्यांदा समोरासमोर येतील. याआधी दोन्ही संघ २००७ मध्ये अंतिम सामन्यासह दोन वेळा समोरासमोर आले होते. दोन्ही वेळा भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. यानंतर, भारत आणि पाकिस्तान २०१२ मध्ये सुपर एटमध्ये पुन्हा भेटले. जिथे पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव झाला.

त्यानंतर दोन्ही संघ २०१४ आणि २०१६ मध्ये टी -२० विश्वचषकावेळी समोर आले. यावेळी देखील पाकिस्तानला भारताकडून पराभवाला सामोरे जावे लागले. याशिवाय २००९ आणि २०१० टी -२० विश्वचषकात दोन्ही संघ एकमेकांसमोर आले नाहीत.

एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानसमोर भारत अजिंक्य

एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सात लढती झाल्या आहेत. १९९२च्या बेन्सन आणि हेजेस विश्वचषकात दोन्ही संघ पहिल्यांदा भेटले. या सामन्यात पाकिस्तानला ४३ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर, पाकिस्तान १९९६, १९९९ आणि २००३ मध्येही आपला पराभव टाळू शकला नाही.

यानंतर, २००७ मध्ये दोन्ही संघ समोरासमोर आले नाहीत. त्यानंतर २०११ च्या उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले. येथेही भारताने पाकिस्तानचा २९ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. या विश्वचषकात भारताने श्रीलंकेला हरवून १९८३ नंतर विश्वचषक जिंकला.

त्यानंतर २०१५ च्या विश्वचषकात दोन्ही संघ समोरासमोर होते. या सामन्यातही पाकिस्तानला ७६ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. २०१९ च्या विश्वचषकात दोन्ही संघ शेवटच्या वेळी एकमेकांविरुद्ध खेळले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव केला.

आयसीसी स्पर्धेदरम्यान भारताने पाकिस्तानला १२ वेळा पराभूत केले आहे. आता टी -२० वर्ल्डकपमध्ये १३ व्या वेळेस भारत पाकिस्तान समोरासमोर येणार आहेत. हा सामना २४ ऑक्टोबर रोजी म्हणजेच येत्या रविवारी होणार आहे. दुबईमध्ये संध्याकाळी सात वाजल्यापासून हा सामना खेळवला जाईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ind vs pak world cup history t20 world cup 24th october abn

ताज्या बातम्या