कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावरील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या सुरुवातीपासूनच खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. पहिल्या दिवशी ११ विकेट्स आणि दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस एकूण २६ विकेट्स पडल्याने खेळपट्टीवर टीका अधिकच तीव्र होऊ लागली. पण, भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सामन्यानंतर केलेल्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं. गंभीरच्या वक्तव्यावर अनिल कुंबळे व डेल स्टेन चकित झाले.
गौतम गंभीरने सामन्यानंतर केवळ खेळपट्टीचा बचाव केला नाही, तर त्याने स्वतःच्या फलंदाजांच्या कमकुवतपणाकडेही लक्ष वेधलं. त्याच्या या विधानाने माजी महान खेळाडू अनिल कुंबळे आणि डेल स्टेन यांनी प्रतिक्रिया दिली. कुंबळे यांनी ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीबद्दल सांगताना गंभीरला सुनावलं आहे.
गंभीर म्हणाला की खेळपट्टीत काहीही चूक नव्हती आणि संघ व्यवस्थापनाला तेच हवे होते. भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीर म्हणाला, “अगदी खेळताच येणार नाही, अशी ही खेळपट्टी नव्हती, त्यात काहीही अवघड नव्हतं. आम्हाला अगदी अशीच खेळपट्टी हवी होती. क्युरेटरने खूप सहाय्य केलं. आम्ही जी मागणी केली होती, तशीच खेळपट्टी आम्हाला मिळाली. जेव्हा तुम्ही नीट खेळत नाही, तेव्हा अशाच गोष्टी घडतात. हो, ही कदाचित मोठे फटके मारता येईल अशी विकेट नव्हती. पण जर तुम्ही तग धरून खेळलात, तर नक्कीच अशी खेळपट्टीवरही धावा करता येतात.”
गौतम गंभीरचं वक्तव्य ऐकून माजी खेळाडू अनिल कुंबळे चकित झाले. अनिल कुंबळेंनी सांगितलं, “ईडन गार्डन्सचा इतिहास पाहिला तर इथे कित्येक कसोटी सामने झाले आहेत. मी अंडर-१९ पासून या खेळपट्टीवर खेळलो आहे, पण तीन दिवसांत इतका बदल झालेली खेळपट्टी मी कधीच पाहिली नाही. गौतम काय म्हणाला ते मी ऐकलं. त्याने सांगितलं की संघालाच अशा प्रकारची खेळपट्टी हवी होती. पण हे ऐकून मी थोडा गोंधळलो, कारण हा संघ अजून तरुण आणि अनुभवहीन आहे.”
दक्षिण आफ्रिकेचा माजी अनुभवी गोलंदाज डेल स्टेनने सुद्धा गौतम गंभीरच्या वक्तव्याशी असहमत आहे. स्टेन म्हणाला, “अनिल म्हणत होता तसं, काही चेंडू दोन फुटावरून फिरून बॅटला चुकवत विकेटकीपरच्या खांद्यावर जात होते. तर दुसरा चेंडू मात्र सरळ घसरत पॅडला लागून फलंदाज बाद होत होता. अशा विकेटवर फलंदाजी करणं खूप कठीण असतं. जेव्हा फलंदाजांना धावा करण्याचे पर्यायच मिळत नाहीत, तेव्हा पूर्णपणे बचावात्मक फलंदाजी करत टिकून राहणं हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट असते आणि याचा सरळ अर्थ असा की अशा पिचवर फलंदाजी करण अत्यंत आव्हानात्मक आहे.”
