IND vs SA Test Series: दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे आणि यादरम्यान दोन्ही संघांमध्ये सुरूवातीला २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. येत्या १४ नोव्हेंबरला पहिला कसोटी सामना कोलकातामधील ईडन गार्डन्स येथे खेळवला जाईल. तर दुसरा सामना २२ नोव्हेंबरला गुवाहाटी येथे होणार आहे. या कसोटी सामन्यासाठी मोठा बदल पाहायला मिळणार आहे. कसोटी क्रिकेटमधील परंपरागत फॉरमॅटच बदलला जाण्याची शक्यता आहे.
कसोटी सामन्यामध्ये दोन तासांचा खेळ होतो, त्यानंतर ४० मिनिटांचा लंच ब्रेक होतो. यानंतर पुन्हा दुसरं सत्र २ तासांचं असत, त्यानंतर २० मिनिटांचा टीब्रेक होतो आणि त्यानंतर पुन्हा २ तासांचं तिसरं सत्र होतं. यानंतर दिवसाचा खेळ संपतो.असं साधारण कसोटी सामन्याच्या एका दिवसाचं शेड्युल असतं. पण भारत आणि दक्षिण आफ्रिका कसोटीत हे चित्र बदललेलं दिसणार आहे.
२२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दिवसाचा क्रम बदलणार आहे. इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, पहिल्यांदाच खेळाडूंना लंचब्रेकपूर्वी टीब्रेक मिळणार आहे, यामागे तसं कारणही आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका कसोटीत लंचब्रेकपूर्वी का होणार टीब्रेक?
गुवाहाटीमध्ये म्हणजे देशाच्या पूर्व भागात लवकर सूर्योदय आणि सूर्यास्त होत असल्यामुळे हा निर्णय घेतला जाणार आहे. गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर होणाऱ्या कसोटीचे पहिले सत्र सकाळी ९:०० ते ११:०० वाजेपर्यंत असेल, त्यानंतर सकाळी ११:०० ते ११:२० वाजेपर्यंत टीब्रेक असेल. दुसरे सत्र सकाळी ११:२० ते दुपारी १:२० वाजेपर्यंत खेळवलं जाईल. तर लंचब्रेक दुपारी १:२० ते दुपारी २ वाजेपर्यंत असेल, तर तिसरे सत्र दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत खेळवले जाईल.
वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “टीब्रेक लवकर घेण्याचे कारण म्हणजे गुवाहाटीमध्ये सूर्य लवकर मावळतो आणि खेळही लवकर सुरू होतो. मैदानावर अतिरिक्त खेळण्यासाठी वेळ मिळावा यासाठी टीब्रेकच्या सत्रात बदल करण्याचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ असेल.” अशाप्रकारे, दुसऱ्या कसोटीतील दिवसाचा खेळ सकाळी ९ वाजता सुरू होईल आणि दुपारी ४ वाजेपर्यंत चालेल.
भारतातील कसोटी सामने सकाळी ९:३० वाजता सुरू होतात. ४० मिनिटांचा लंच ब्रेक असतो (सकाळी ११:३० ते दुपारी १२:१०). त्यानंतर, दुसरे सत्र पुन्हा सुरू होते. दोन्ही संघ २० मिनिटांचा टी-ब्रेक घेतात (दुपारी २:१० ते दुपारी २:३०). यानंतर, तिसरे सत्र दुपारी २:३० ते ४:३० पर्यंत असते. सामनाधिकारी संघांना दररोज ९० षटकं पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त अर्धा तास देऊ शकतात. यापूर्वी, बीसीसीआयने रणजी करंडक सामन्यांसाठी सूर्यास्ताच्या वेळेनुसार सत्र वेळापत्रकात बदल केले आहेत.
